उस्मानाबाद / प्रतिनिधी-     

ढोकी येथील तेरणा साखर कारखान्याच्या निविदा प्रक्रियेबाबत डीआरटी कोर्टाने ३१ जानेवारीपर्यंत निर्णय द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आहेत. यामुळे कारखाना लवकर सुरू होण्याची आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी जिल्हा बँकेने निविदा प्रक्रिया राबवली होती. यामध्ये भैरवनाथ शुगर्सची निविदा स्विकारून अंतिम करण्यात आली. मात्र, वेळेत निविदा न दाखल केल्याचे कारण सांगत लातूरच्या ट्वेंटीवन साखर कारखान्याची निविदा नाकारली. यामुळे या कारखान्याने खंडपिठात याचिका दाखल केली होती. तेव्हा खंडपीठाने पुढील प्रक्रियेला स्थगिती देऊन हे प्रकरण डिआरटी अर्थात कर्ज वसूली न्यायाधिकरणात चालवण्यात यावे, अशी सूचना दिली होती. यावर ट्वेंटीवन कारखान्याने डीआरटीकडे दाद मागितली असता डीआरटीने  पुढील निर्णय घेण्यास अंतरिम मनाई करून निविदा उघडा, अथवा म्हणने सादर करण्याबाबत सांगितले. यावर १५ जानेवारीला सुनावणीची तारिख नेमली. परंतु, भैरवनाथ शुगरने स्थगितीला खंडपिठात आव्हान दिले होते. यावर सोमवारी सुनावणी झाली असता खंडपीठाने ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याबाबत आदेशित केले. यासोबतच तेरणाच्या चार सभासदांनी कारखाना लवकर सुरू होण्यासाठी न्यायालयात खंडपिठात धाव घेतली होती.


 
Top