परंडा / प्रतिनिधी : - 

करियर निवडताना विद्यार्थ्यांनी समोर समस्या आणू नये समस्यावर मात करत करिअरच्या संधी प्राप्त कराव्यात असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा .गे .शिंदे महाविद्यालयात जिजाऊ सावित्री जन्मोत्सव कार्यक्रमांमध्ये  बुधवार दि.५ रोजी आयोजित केलेल्या व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प गुंफताना प्रमुख व्याख्यात्या श्री शिवाजी महाविद्यालय परंडा येथील प्राचार्य आशा मोरजकर यांनी व्यक्त केले.

    यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. दीपा सावळे या उपस्थित होत्या तर व्यासपीठावर राणीताई गवळी, बालिका शिंदे ,आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ.महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे उपस्थित होते.

 यावेळी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . आशा मोरजकर यांनी जिजाऊ वंदना घेतली .प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी पाहुण्यांचा परिचय केला. आरती नलवडे हिने सावित्रीबाई फुले यांचे गीत सादर केले.आधुनिक काळातील मुलींच्या करिअरच्या संधी आणि समस्या या विषयावर प्राचार्या अशा मोरजकर यांनी व्याख्यान दिले.त्यांनी व्याख्यानात पुढे बोलताना म्हणाल्या की सावित्रीबाई फुले यांनी अंगावर चिखल दगड घेतल्यामुळेच आज आपण शिकत आहोत, तेव्हा सावित्रीबाई फुले यांचे योगदान लक्षात घेता शाळा महाविद्यालयातील मुलींनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे, स्वतःची कर्तव्य व जबाबदारी ओळखावी.सध्या स्पर्धा वाढल्याने विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे.चालू अभ्यासक्रमाबरोबरच संगणकाचा अभ्यास करावा.सध्या कोरोना  या रोगाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करावा आणि मोबाईलचा वापर केवळ शिक्षणासाठीच करावा असे मत व्यक्त केले.

    अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ दीपा सावळे म्हणाले की शाळा महाविद्यालय ज्ञानाचा झरा असलेले ठिकाण आहे.विद्यार्थ्यांनी त्या ज्ञानाचा झरा आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे .मुलींनी स्वावलंबी होणे आवश्यक आहे ,स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजे.त्यासाठी स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे.चौकस असले पाहिजे आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पी बी माने यांनी केले तर आभार कु.साक्षी साळवे या विद्यार्थिनीने मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.यावेळी कनिष्ठ वरिष्ठ वर्गातील विद्यार्थिनी, प्राध्यापिका व युवती मंच च्या पदाधिकारी उपस्थित होत्या. 

 
Top