उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून किसान सभा कार्ड काढून घेण्यासाठी सहाय्य केले जाणार आहे. यासंदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

स्थायी समितीची बैठक मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये किसान सभा कार्ड शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असल्यामुळे तसेच याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्यामुळे हे कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य करण्याचा मुद्दा अध्यक्षा कांबळे यांनी उपस्थित केला. तेव्हा त्याला अन्य सदस्यांनीही अनुमती दर्शवली. यामुळे आता केंद्र शासनाचा अंगिकृत उपक्रम असलेले हे कार्ड काढण्यासाठी पंचायत विभाग सहाय्य करणार आहे. तसेच सभेत झेडपी शाळांच्या मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. यापैकी ४३ पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ व शिक्षणाधिकाऱ्यांनी अधिकाराचा वापर करावा, असेही निर्देश देण्यात आले. माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी तासिका बेसवर शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबतही सांगण्यात आले. मात्र, यापुर्वीच पीआरसीने यासंदर्भात आक्षेप घेऊन दिलेल्या रकमेची वसूली करण्यास सांगितल्यामुळे याची कायदेशिर बाजू तपासून निर्णय घेण्याबाबत सूचवण्यात आले.


 
Top