दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन


उस्मानाबाद
: एक पत्रकार काय करू शकतो ते बांगला देशातील एका पत्रकाराने दाखवून दिले आहे. त्याच्यामुळेच बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यामुळे सत्तेच्या बाजूने रहायचे की सत्याच्या बाजूने रहायचे हे प्रत्येकाने ठरवणे आवश्यक आहे. जे सत्याच्या बाजूने असतील तेच जगाच्या कायम स्मरणात राहतील तर सत्तेच्या बाजूने असतील ते काळाबरोबरच प्रवाहात वाहत जातील, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केले.


जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने र्दपण-पत्रकार दिनानिमित्त पत्रकारभवन, उस्मानाबाद येथे गुरूवारी (दि.६) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास माहिती संचनालयाचे उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी उन्मेश वाळींबे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री तुळजाभवानी देवी व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष श्री. पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. पत्रकार शिला उंबरे यांची काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल तर दैनिक 'पुण्य नगरी' चे ढोकी प्रतिनिधी सुरेश कदम यांना उदगीर पत्रकार संघाचा मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. रणदिवे, सुत्रसंचालन पत्रकार दीपक जाधव तर आभार पत्रकार संघाचे सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य यांनी मानले.कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक भारत डोलारे, पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष संतोष हंबीरे,जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, प्रमोद कांबळे, तालुकाध्यक्ष अंबादास पोफळे, सुरेश घाडगे,गौतम चेडे, पार्श्वनाथ बाळापुरे,  पत्रकार  प्रभाकर लोंढे, महेश पोतदार,  पत्रकार संघाचे संघटक मल्लिकार्जून सोनवणे,विनोद बाकले, सतोष शेटे, पत्रकार सुरेश कदम, शाहरुख सय्यद, जयराम शिंदे, छायाचित्रकार राहुल कोरे, किशोर माळी यांची उपस्थिती होती.


पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनीय

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनीय आहे. संघाच्या त्या काळातील पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून मराठवाड्यातील पहिले पत्रकार भवन उभारण्याचा मान उस्मानाबाद जिल्ह्यास मिळाला आहे. पत्रकार संघाच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येतात.पत्रकारांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात येते. पत्रकारांचे मार्गदर्शक तथा माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांचा वाढदिवस व दर्पण दिन असा दुहेरी योग साधून पत्रकार दिन साजरा करण्याचे भाग्य लाभल्याचे प्रतिपादन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी व्यक्त केले.


प्रत्येकाने शब्दतिर्थाच्या वारीत सहभागी व्हावे

 निसर्गाने प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी शब्द हे अस्त्र दिले आहे. दर्पण दिन साजरा करीत असताना या शब्दतीर्थाचे महत्व जाणणे आवश्यक आहे. शब्दानेच मने जोडता येतात. शब्द घावही करतात. शब्दतीर्थाच्या या वारीत वाचकांच्या माध्यमातून पांडुरंग आपल्या कामाची नोंद घेत असतो. या जिल्ह्यात खूप काम झाले पण जितकं झालं ते पुढे का आले नाही?  कारण मराठवाड्यातील माणूस बोलण्यात कमी पडतो, अशी खंत आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी उन्मेश वाळींबे यांनी व्यक्त केली.  बोलणे ही साधना आहे. शब्दाचे सामर्थ्य वाढवून या शब्दतिर्थाच्या वारीत प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे, असे मतही श्री. वाळींबे यांनी यावेळी व्यक्त केले.


आव्हानांना तोंड द्यायचे असेल तर सिंहावलोकन आवश्यक

जगातल्या लोकशाही देशात जे काम झाले नाही ते काम स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील पत्रकारांनी केले आहे.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. लोकमान्य टिळक, आगरकर यांनी स्वातंत्र्य नसताना त्या काळात उल्लेखनीय कार्य केले. प्रिंट मिडीयासमोर आज अनेक आव्हाने उभे राहिली आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रगल्भ होवून व्यक्तीमत्व खुलवणे  आवश्यक आहे. त्यासाठी खूप समजून घ्या, वाचन वाढवा. आपल्याला कुठे जायचे आहे, आपण कुठपर्यंत आला आहोत, याचे सिंहावलोकन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माहिती संचनालयाचे उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांनी केले.

 
Top