उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेनेवर प्रचंड प्रेम करणारे, उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले शाखाप्रमुख दत्तात्रय वऱ्हाडे (६५) यांनी कोरोनाने आलेल्या आर्थिक नैराश्यातून गळफास लावत आत्महत्या केली. गळफास घेण्यापूर्वी त्यांनी झाडावर शिवसेनेचा भगवा फडकावला. त्यांच्या मागे पत्नी, चार मुली, दोन मुलगे आहेत.

 मुंबईच्या बाहेर मराठवाड्यातील ग्रामीण भागात  शिवसेनेशी सहसा कोणाची ओळख नव्हती. फक्त बाळासाहेब ठाकरे, यांच्या विषयी ऐकुन होते. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख निवडलेले नव्हते, त्यावेळी शहरातील जुनी गल्ली भागात दत्तात्रय वऱ्हाडे शिवसेनेच्या पहिल्या शाखेचे प्रमुख झाले. हा मान ते आयुष्यभर मिरवत राहिले. शिवसेनेने जिल्ह्याला अनेकवेळा खासदार, आमदार दिले. मात्र, वऱ्हाडे शेवटपर्यंत शेवटच्या फळीतले शिवसैनिकच राहीले. त्यांना सेनेच्या लोकप्रतिनिधींपर्यंतही कधी पोहोचता आले नाही. पहिल्या शाखाप्रमुखपदापासून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतलेले वऱ्हाडे सत्तेच्या वाट्याचे लाभार्थी कधीही झाले नाहीत. शहरातील जुनी गल्ली भागात जुन्या घरात वाढलेले वऱ्हाडे यांनी शिवसेनेेवर अपार प्रेम केले. मात्र स्वत:च्या जीवनात त्यांनी अनेक यातना भोगल्या. शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात किंवा अन्य तीन ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये चहाची टपरी मांडून कुटंुबाचा उदरनिर्वाह करणारे वऱ्हाडे नगरपालिका, बांधकाम विभागाच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्याही रडारवर आले. त्यांची टपरी तीनवेळा उचलण्यात आली. अत्यंत हालअपेष्टा भोगणाऱ्या वऱ्हाडे यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनीही मदत केली नाही, अशी खंत जुने शिवसैनिक व्यक्त करतात. यापूर्वी अतिक्रमणात त्यांची टपरी काढल्याची बातमी माध्यमातून आल्यानंतर मुंबईतील शिवसैनिकांनी त्यांना टपरीसाठी पत्रे, हॉटेलसाठी गॅस, साहित्य दिले होते. दोन वर्षांपासून कोरोनाने त्यांचा व्यवसायही ठप्प झाला होता. त्यातून निर्माण झालेली आर्थिक चणचण आणि नैराश्य, यामुळे त्यांनी सोमवारी सायंकाळी घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. वऱ्हाडे यांनी गळफास घेण्यापूर्वी झाडावर चढून शिवसेनेचा भगवा फडकावला.

 
Top