उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी बुधवारी जिल्हास्तरावर, उपविभाग स्तरावर, तहसील स्तरावर, मतदान केंद्र स्तरावर तसेच पदनिर्देशि‍त ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत झालेल्या मतदार यादीत ४३ हजार २९२ नवीन मतदारांचा समावेश झाला आहे.

या मतदारांना आता आगामी जिल्हा परिषदेसह, नगरपालिका आणि महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्ह्यात मतदारयादीचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे.कार्यक्रमानुसार १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्याचप्रमाणे जुन्या मतदार यादीत ज्यांची नावे दुबार, कायमस्वरुपी स्थलांतरीत, मृत, आढळून न आलेल्या मतदारांची नावे भारत निवडणूक आयोगाच्या निमयामानुसार कार्यपध्‍दती अनुसरुन वगळण्यात आली आहेत. तसेच मतदारांचा तपशिलाबाबतच्या नोंदीही दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, नायब तहसीलदार चेतन पाटील यांनी जिल्हाभरात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचे नियोजन केले. बीएलओच्या माध्यमातून प्रत्येक मतदार केंद्रनिहाय नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमात नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली आहेत.

जिल्ह्यातील मतदारांची संख्या: पुरुष मतदार ७ लाख २१ हजार ४७८, महिला मतदार ६ लाख ३३ हजार ४०५, तृतीयपंथी मतदार २२, असे एकूण मतदार १३ लाख ५ हजार ४९० आहेत.

 
Top