उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 काँग्रेस पक्षामध्ये घराणेशाही यापुढे चालणार नाही तर पक्षासाठी केलेल्या कामाच्या स्वरूपात संधी दिली जाणार असल्याची माहिती माजी आमदार तथा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक, जिल्हा प्रभारी विश्वनाथ चाकोते यांनी उस्मानाबादेत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

       काँग्रेस पक्षाची सदस्य संख्या वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हानिहाय आढावा बैठक घेतली जात आहे. यानिमित्ताने विश्वनाथ चाकोते,सह प्रभारी पंडित सातपुते उस्मानाबादेत दाखल झाले. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत ३५ हजार सदस्य आहेत. प्रत्येक बूथ वर तीन पुरुष आणि एक महिला यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून सदस्य संख्या वाढवली जाणार आहे यासाठी सभासद फीस म्हणून पाच रुपये नाममात्र सभासद रक्कम स्वीकारली जाणार आहे. काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हानिहाय आढावा बैठक घेतली जात आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता मिळविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर बैठकांचा कार्यक्रम सुरू आहे असे चाकोते यांनी यावेळी सांगितले.

     जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेस कमिटीचे संघटक राजाभाऊ शेरखाने,जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,लक्ष्मण सरडे, स्मिताताई शहापूरकर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे,उपाध्यक्ष प्रशांत पाटील,संजय घोगरे अशोक भातलवंडे,मिलिंद गोवर्धन, ॲड विश्वजीत शिंदे ॲड जावेद काझी यांची यावेळी उपस्थिती होती.

     काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष खालील सय्यद यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.

 
Top