उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्याचे अर्थकारण पूर्णत: कृषी क्षेत्राशी निगडित असून शेतीसाठी योग्य व शाश्वत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी बोरी धरण, मांजरा धरण यासह जिल्ह्यातील मोठे पाणी साठे असलेल्या ठिकाणी बंद पाईपलाईन योजना राबवावी. तसेच यासाठी एकात्मिक आराखडा तयार करून केंद्र व राज्य सरकार दोन्हीकडून निधी मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात यावा, अशी मागणी भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सोमवारी (दि.27) विधानसभेत केली.
जिल्ह्यात जेथे मोठे पाणी साठे आहेत तेथे बंद पाईपलाईन योजना राबविण्याची मागणी 21 जानेवारी 2021 रोजी जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कमी असून नीती आयोगाने घोषित केलेल्या आकांक्षित जिल्ह्याच्या यादीमध्ये उस्मानाबाद चा समावेश आहे. अशा योजना राबविण्यात आल्या तर शेतकर्यांना शाश्वत पाणी मिळेल, सिंचन क्षेत्र वाढेल. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी बंद पाईपलाईनद्वारे शेतकर्यांना पाणी देण्याची योजना आखावी व याचा एक एकात्मिक आराखडा तयार करून केंद्र व राज्य सरकार दोन्ही कडून निधी मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची मागणी केली. बंद पाईपलाईन चे महत्व अधोरेखित करत सन्माननीय सदस्यांची सूचना योग्य असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी राज्यात इस्थळ जि. बीड, तांदुळजा जि. लातूर व तट बोरगाव जि. उस्मानाबाद येथे प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या विषयाचा नीती आयोगाकडे प्रस्ताव देण्यासाठी आपण आग्रही पाठपुरावा करणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले आहे.