उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी जयंती निमित्त आज उस्मानाबाद येथे लोकसेवा समितीच्या वतीने लोकसेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात निरपेक्षपणे सेवाभाव जागा ठेवून वर्षानुवर्षे सामाजिक काम करणाऱ्या प्रसिद्धीपासून दूर राहून निरपेक्षपणे सामाजिक काम करणाऱ्या समाज सेवकांना हे पुरस्कार वितरण करण्यात आले.

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सेवा  कार्याचे स्मरण समाजाला सतत होत राहावे आणि समाजातील सेवाभाव हा अटलजींच्या स्वभावातील गुण समाजात परिवर्तीत व्हावा , निरपेक्षपणे सेवा करणाऱ्यांच्या  पाठीवर कौतुकाची थाप पडावी या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांच हे बारावे वर्ष असून हे लोकसेवा पुरस्कार हे लोकचळवळीचे स्वरूप व्हावे , निरपेक्षपणे काम करणाऱ्या सेवाभावी वृत्तीचा समाजाने गौरव करावा , समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे , त्यातून त्या समाजसेवकांना निरपेक्ष समाजसेवेची प्रेरणा मिळावी आणि सेवाभाव वाढीस लागावा यासाठी हा पुरस्कार देण्यात येत  असल्याची माहिती एडवोकेट मिलिंद पाटील यांनी यावेळी दिली. 

तर विद्या भारती चे श्री शेषाद्री डांगे यांनी या पुरस्कारांचे वेगळेपण सांगताना covid-19 सारख्या महामारी च्या काळातही सामाजिक कामात व्यत्यय न येऊ देता समाजाचे रक्ताची गरज भागवण्यासाठी पुढे येऊन श्री साई गणेश मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो रक्तदात्यांना रक्तदान करण्याची प्रेरणा देणाऱ्या श्री रोहित निंबाळकर यांचे कार्य तसेच आपले दुःख विसरून अनाथ बालकांच्या आयुष्यात आपलेपणा निर्माण करून त्यांना वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी झटणाऱ्या गरजे दाम्पत्याचे वेगळेपण आणि उस्मानाबाद शहर आणि परिसरात निधनानंतर अंत्यविधीच्या कामात स्वतःला झोकून देऊन हजारो व्यक्तींच्या अंत्यविधीला मदत करणारे श्री बाळासाहेब गोरे यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले.

       यावेळी लोकसेवा पुरस्कार विजेते रोहित शशिकांत निंबाळकर यांना रक्तदान सेवेबद्दल , बीड जिल्ह्यातील गेवराई येथील अनाथ मुलांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या गरजे दांपत्याला आणि उस्मानाबाद येथील श्री बाळासाहेब गोरे यांना काम वर्षानुवर्षं करत असलेल्या अंत्यविधीच्या सेवेसाठी लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.  लोकसेवा समितीचे अध्यक्ष एडवोकेट मिलिंद पाटील सदस्य श्री शेषाद्री डांगे कार्यवाह श्री कमलाकर राव पाटील लोकसेवा समितीच्या सदस्या सौ सुषमा मिलिंद पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

 
Top