उस्मानाबाद (प्रतिनिधी )

वसंतराव नाईक तांडा वस्ती व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अशासकीय समितीच्या अध्यक्षपदी बंजारा समाजातील व्यक्तीची निवड केल्याशिवाय जिल्हास्तरीय नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात येऊ नये अशी मागणी तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आले.

 उस्मानाबाद जिल्हाधिकार्‍यांना आज दिनांक 22 डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की अशासकीय समितीच्या अध्यक्षपदावर बंजारा समाजातील एका व्यक्तीची निवड करावी अशी मागणी संघटना आणि समाजाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली होती. मात्र ही निवड अद्याप पर्यंत झालेली नाही. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय समितीस सहाय्य करण्यासाठी अशासकीय समितीची स्थापना केली आहे. या समितीवर तालुका लोकप्रतिनिधी ची नियुक्ती केल्यामुळे यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेमुळे तांडा वस्तीचा समतोल विकासामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, तांडा वस्ती विकासाला खीळ बसू शकते,तांडा वस्ती विकासामध्ये पारदर्शकतेचा अभाव जाणवू शकतो. असा संदर्भ जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आले आहे.

 याकरिता उस्मानाबाद जिल्ह्यातील या अशासकीय समितीवर बंजारा समाजातील एका व्यक्तीची अध्यक्षपदी निवड करण्याची गरज आहे ही निवड होईपर्यंत जिल्हास्तरीय नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात येऊ नये अन्यथा संघटनेच्यावतीने शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या शेवटी दिलेला आहे.

     या निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश पवार, कार्याध्यक्ष लक्ष्मण राठोड,कोषाध्यक्ष बब्रुवान चव्हाण, हरीश टिकाराम जाधव, रेणुका राठोड,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top