उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांची वीज तोडली जाते, खरीप २०२० चा हक्काच्या पीक विमा अजुनही मिळत नाही. मराठा व ओबीसी बांधवांना आरक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. महा विकास आघाडी सरकारकडून सहजा सहजी कोणत्याही विषयात न्याय मिळत नाही व ‍मिळणारही नाही. त्यामुळे लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाची प्रेरणा घेवुन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष करावाच लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुरात आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात केले.

शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक सचिन पाटील यांनी तुळजापूर येथे शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. पाटील म्हणाले की, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना विजेची गरज आहे. सरकार कृषी पंपाची वीज तोडत आहे. खरीप २०२० पीक विमा प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर शासन व विमा कंपनीने शपथपत्र दाखल केले. मा. सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणुन दिलेल्या बाबींची पूर्तता सरकार प्राधान्याने करत नाही. अजुनही मराठा समाजाचा इंपेरिअल डेटा गोळा करण्याचे निर्देश मागासवर्गीय आयोगाला दिले नाही. जिल्ह्यात सर्वाधिक १५९ रोजगार हमी योजनेची कामे तुळजापूर तालुक्यात चालु आहेत. पंतप्रधान देशासाठी काम करत आहेत. पी.एम.किसान योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते. कोविड महा मारीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोफत अन्नधान्य योजना राबवली. ‘प्रशाद’ योजनेच्या माध्यमातुन तुळजापूर व परिसराचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार समाधान आवताडे यांनी ताकतीने पंढरपूरची जागा निवडुन आणली. तसेच लोकनेते कै.गोपीनाथराव मुंडे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर आवताडे यांचा सत्कार केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक आलुरे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार गंगणे, पंचायत समितीच्या सभापती रेणुकाताई इंगोले, माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, विनोद गंगणे, प.स. उप सभापती साठे, गणेश सोनटक्के, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले नगरसेवक, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top