उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या बेंबळीच्या ग्रामपंचायतीत सध्या अनागोंदी कारभाराने कळस गाठला आहे. ग्रामपंचायतीने चक्क नुकत्याच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने त्याच तारखेचा जन्माचा दाखला निर्गमित केला आहे. या प्रकाराची सोशल मीडियात जोरदार चर्चा होत असून ग्रामसेवकाला पोस्ट करणाऱ्यांनी ढ संबोधले आहे.

बेंबळी येथील ज्येष्ठ नागरिक सदाशिव कोंडीबा पारवे यांचा मृत्यू दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी झाला अाहे. बेंबळी ग्रामपंचायतने मात्र, त्याच दिवशी त्यांचा जन्म झाल्याचे प्रमाणपत्र बहाल केले. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच दिवशी त्याचा जन्म झाल्याचे सांगण्याची किमया बेंबळी ग्रामपंचायतीने घडवली आहे. विशेष म्हणजे यावर ग्रामविकास अधिकारी यांचीही सही आहे. लिपिकाने हे प्रमाणपत्र तयार केलेले असले तरी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्याच्यावर डोळे झाकून सही केली का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामपंचायतच्या अशा अनागोंदी कारभारावर हसावे कि रडावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे असे प्रमाणपत्र व पारवे यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ग्रामपंचायतच्या अशा कारभारावर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, काहींनी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना “ढ’ संबोधले आहे.

या संदर्भात बेंबळी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री.आगळे यांना संपर्क साधला असता त्यांनी कांहीच प्रतिक्रिया दिली नाही.


 
Top