उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नगरपालिकेच्या वतीने मंगळवारी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत विविध प्रकारचे 400 पेक्षा अधिक ठराव मंजूर करण्यात आले आहेत. आगामी काळात निवडणुका होत असल्यामुळे विविध विकास कामे करण्याचे ठराव घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नाली व रस्ते तयार करण्याचे ठराव आहेत.

नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी उत्साहात पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर होते. याप्रसंगी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये जिम तयार करणे लॉन्स लावणे, पेवर ब्लॉक बसवणे, नाली तयार करणे, रस्ते तयार करणे यासंदर्भात ४१९ विविध प्रकारचे ठराव घेण्यात आले. वेगवेगळ्या भागातील नगरसेवकांनी हे ठराव मांडले होते. आपल्या भागात असलेल्या विविध प्रकारच्या अडचणींवर आधारित हे ठराव असल्यामुळे नगराध्यक्षांनी यावर विशेष कोणतीही चर्चा न करता सर्व ठरावांना मंजुरी दिली. परंतु या ठरावांना तांत्रिक स्वरूपाची व प्रशासकीय स्वरूपाची मान्यता आताच नसणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या ठरवा सोबतच आगामी 30 वर्षांपर्यंत म्हणजेच 2054 पर्यंत उस्मानाबाद शहराची लोकसंख्या जितकी होईल तेवढ्या लोकांना पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. याच्या डीपीआर ला मंजुरी देण्यात आली. सुमारे 300 कोटी रुपयांची ही योजना असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

 
Top