उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारप्रमाणे इंधनावरील कर कमी गरज असताना महाविकास आघाडी सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत तसे न करता दारूवरील कर ५० टक्के कमी करून दारू विक्रेत्यांवर मेहेरबानी केली अाहे, असा टाेला भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्य सरकारला लगावला अाहे.

ते म्हणाले की, लाॅकडाऊनमध्ये देखील ठाकरे सरकारने मंदिरे बंद ठेवून मदिरालये सुरु केली होती.त्यामुळे इंधनावरील नाही तर दारूवरचा कर कमी केल्याने, राज्य सरकारचा भाव उतरला आहे. दारूवरचा कर कमी केल्याने दररोज १ लाख बाटल्यांची होणारी विक्री आता २.५ लाखांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. जनतेची दिशाभूल करण्यात पटाईत सरकारची प्राथमिकता स्पष्ट होत आहे. इंधन दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन करणारे महाघटक पक्ष केंद्राने भाव कमी केल्यानंतर चिडीचूप आहेत. २५ राज्यांनी केंद्र सरकारच्या आवाहनानंतर भाव कमी केले. महाराष्ट्रात मात्र प्रतिसाद नाही. हा दुटप्पीपणा जनतेने ओळखला आहे. या सरकारला दारूविषयी विशेष प्रेम का आहे, लॉकडाऊन काळात देखील दारूची दुकाने सर्वात आधी उघडली गेली, बार आधी खुले झाले, पण लोकांच्या हिताची कामे उशिरा सुरू झाली. राज्य सरकारने आताही पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून दिलासा देण्याऐवजी तळीरामांची दिवाळी साजरी करण्यात येत असल्याचा आरोप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला अाहे.

 
Top