राज्य सरकारी कर्मचार्यांना जुनी पेंशन सुरू करावी, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर निघालेल्या पेंशन संघर्ष यात्रा उस्मानाबाद शहरात दाखल झाली. या यात्रेचे सोमवारी दि. 29 नोव्हेंबर रोजी उस्मानाबादेत स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटना संयोजित महाराष्ट्रातील कर्मचार्यांच्या सुमारे 65 संघटना एकत्रित येत सर्व कर्मचार्यांची एकसंध अशी जुनी पेन्शन संघर्ष समिती तयार झाली आहे. सर्व कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी व मयत कर्मचार्यांच्या कुटुंबास फॅमिली पेन्शन मिळावी यासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला व त्याचे रूपांतर पेन्शन संघर्ष यात्रेत झाले. 22 नोव्हेंबर पासून राज्यभरात सुरू झालेल्या या पेन्शन संघर्ष यात्रेस सर्व कर्मचार्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, पेन्शन संघर्ष यात्रेचे जंगी स्वागत त्या त्या जिल्हयात होत आहे
दि. 01 नोव्हेंबर, 2005 रोजी व नंतर रुजु झालेल्या शासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजनेचे लाभ पूर्ववत लागू करावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करून, मोर्चे काढून, निदर्शेन करून निषेध व्यक्त केलेला आहे. सध्या जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती यांच्या वतीने दि. 22 नोव्हेंबर 2021 (आझाद मैदान मुंबई) ते दि. 08 डिसेंबर 2021 (सेवाग्राम वर्धा) पर्यंत सर्व 36 जिल्ह्यातून पेन्शन संघर्ष यात्रा काढली जाणार आहे. त्या अनुषंगाने आज दि.29 नोव्हेंबर 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर उड्डाण पूल ते जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे पेन्शन रँली काढून निषेध व्यक्त केलेला आहे.
शासनाच्या या अन्यायी धोरणाविरुद आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, लिपिकवर्गीय, चतुर्थ शेणी तथा अन्य संवार्गीय पदाच्या कर्मचारी संघटना एकत्र आल्या असून दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी मुंबई येथे जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती या नावाने समन्वयाची व एकतेची वज्रमूठ बांधली आहे. तसे निवेदन आज मुख्यमंत्री महोदय यांना जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्यामार्फत जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने देण्यात आलेले आहे. यावेळी जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत माने, जिल्हा सचिव उमेश खोसे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.