उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हयातील कांही कार्यकर्त्यांवर एसपी शुगर अॅण्ड अॅग्रोचे चेअरमन सुरेश पाटील यांनी खंडणी मागणे, कारखाना बंद पाडणे, कारखान्यातील अधिकाऱ्यांना धमक्या देणे आदी आरोप केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सोमवार दि. ८ नोव्हेंबर रोजी उस्मानाबादेत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी माझा माझ्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. खरे-खोटे तपासायचे असेल तर एमडी, शेतकरी अधिकारी यांचे कॉल डिटेल्स  तपासा, असे आव्हान दिले. 

एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील सोमवारीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर विविध आरोप करत रस्ता रोको केला होता. त्यानंतर राजु शेट्टी, पीक विम्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांंना भेटण्यासाठी सोमवारी आले होते. त्यावेळी त्यांनी एसपी शुगर अॅण्ड अॅग्रोचे चेअरमनवर गंभीर आरोप करताना रिधोरे गावातील शेतकऱ्यांचा ऊस गतवर्षी २,५००  रुपये भाव देतो म्हणुन आणला, परंतू टनाला २,२०० रुपये प्रमाणेच पैसे दिले.त्या उरलेल्या ३०० रुपयांसंदर्भात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोन केला. त्यामुळे असे आरोप झाले असतील, असे सांगून राजु शेट्टी यांनी या कारखान्याचे एमडी, शेतकी अधिकारी यांचे कॉल डिटेल्स  तपासल्यास सत्य समोर येईल, असे सांगितले. यावेळी रवींद्र इंगळे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

 
Top