उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महसूल विभागाच्या वतीने सप्टेंबर २०२० पासून जिल्ह्यात शेतरस्ते, शिवरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेण्यात आली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची संमती होत नसल्याने तेथील तहसील कार्यालयात सोमवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता रस्ता अदालत घेण्यात येणार आहे. 

अनेक शेतकरी शेतरस्ते उपलब्ध करण्याची मागणी घेऊन जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात येत आहेत. शेतरस्त्यावरील अतिक्रमणे काढणे, नवीन शेतरस्ते उपलब्ध करण्याची स्थानिक पातळीवर दखल घेऊन निराकरणासाठी तहसील कार्यालयात रस्ता अदालत घेण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. संबंधित तहसील कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी रस्ता अदालत घेण्यात येणार आहे. उस्मानाबाद तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन गावातील रस्ते खुले करणे अथवा नवीन रस्ता मिळण्याबाबतचे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.


 
Top