श्री. सिध्दीविनायक कारखान्याच्या चाचणी गाळप हंगामाचा शुभारंभ 


उस्मानाबाद / प्रतिनिधी - श्री. सिध्दीविनायक उद्योग समुहाची वाटचाल दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी सुरु असून जे बोलेल ते करुन दाखविनारा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे अल्पकाळातच या उद्योग समूहाच्या वतीने उभारण्यात आलेला गुळ पावडरचा कारखाना या भागातील ऊस उत्पादक शेतकऱयांचा विश्वास संपादन करुन खऱया अर्थाने शेतकऱयांची आर्थिक क्रांती घडेल असा विश्वास भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला. 


तुळजापूर तालुक्यातील देवकुरूळी येथे उभारण्यात आलेल्या श्री सिध्दीविनायक ऍग्रीटेक या गुळपावडर कारखान्याच्या चाचणी गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉ.श्री.पद्मसिंह पाटील, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, महंत तुकोजी बुवा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार ठाकूर हे बोलत होते. पुढे बोलताना आमदार सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, श्री. सिध्दीविनायक ऍग्रीटेकच्या वतीने शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांतीसाठी ७०० मेट्रीक टन क्षमतेचा हा गुळपावडर कारखाना सुरु होत आहे. या संस्थेच्या व्यवहारात प्रामाणिकपणा, पारदर्शकता व शेतकऱयांचा विश्वास संपादन करण्याची क्षमता असल्यामुळे पुढच्या वर्षीच या कारखान्याची क्षमता १२५० मेट्रीक टन करावी लागेल. या कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होईल असे सांगून केवळ आठ महिन्याच्या कालावधीत या कारखान्याने गळीत हंगाम सुरु केला असून एवढय़ा कमी वेळात महाराष्ट्रातील कुठलाही कारखाना उभारला गेला नाही. जी जवाबदारी अंगावर येईल ती यशस्वीपणे पार पाडण्याचा स्वभाव दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा असल्याने हा कारखाना निश्चित यशस्वी होईल विश्वास आमदार ठाकूर यांनी व्यक्त केला. 

सिध्दीविनायक उद्योग समुहाने अनेक क्षेत्रात आपल्या  कार्यक्षमतेने नावलौकीक वाढविला असून हा कारखाना या भागातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करेल असा विश्वास  भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी व्यक्त केला. 

गव्हानीत मान्यवरांच्या हस्ते मोळी टाकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, श्री सिध्दीविनायक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात कारखाना उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या अभियंते, अधिकाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा आज वाढदिवस असल्याने मान्यवरांच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. नितीन भोसले, सुत्रसंचालन ऍड. प्रतिक देवळे तर आभार प्रदर्शन विशाल रोचकरी यांनी केले.  या कार्यक्रमासाठी रुपामाता परिवाराचे ऍड. व्यंकट गुंड, यशवंत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सतिश दंडनाईक, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड. अनिल काळे, ऍड. खंडेराव चौरे, ऍड. राजेंद्र धाराशिवकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरकारी वकील ऍड. शरद जाधवर, नागेश अक्कलकोटे, अनंत जाधव, ऍड.राम गरड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे संचालक ऍड.निलेश बारखडे, सुनील काकडे, अभय इंगळे, धनंजय रणदिवे, कैलास शिंदे, आनंद कंदले, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्यासह सहकर व बँकींग क्षेत्रातील अनेक मान्यवर, ऊस उत्पादक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

२ हजार १०० रुपये भाव देणार - दत्ता कुलकर्णी 

हा कारखाना नविन असला तरी महाराष्ट्रातील ज्या साखर कारखान्यानी चांगला भाव दिला तेवढाच भाव शेतकऱयांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या भागातील ५ हजार ३८ हेक्टर ऊसाची नोंद आमच्या कडे झाली असून ६७१ व ८६०३२ या तीस किलोमिटरच्या आतील शेतकऱ्यांच्या ऊसासाठी २ हजार १०० रुपये भाव देणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. शेतकऱ्याच्या ऊसाचे बील शेतकऱ्यांनी ऊस घातल्यानंतर १५ दिवसाच्या आत त्यांच्या खात्यावर एक रक्कमी जमा करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. चाचणी गळीत हंगामात ८० हजार टनाचे गाळप करण्याचा मानस आहे. तसेच या भागातील ऊस ऊत्पादन वाढावे यासाठी या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची समिती नेमण्यात आली असून ही समिती शेतकऱयाच्या फडात जावून शेतकऱ्यांना मागदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 
Top