उस्मानाबाद  / प्रतिनिधी

कांही दिवसापुर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यांवर आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती.त्यावेळी खा.ओमराजे निंबाळकर, अा.कैलास पाटील यांनी एमपीएससी, यूपीएससी  विद्यार्थ्यांसाठी एक ही मोठी अभ्यासिका अथवा मार्गदर्शन केंद्र नसल्याचे सांगितले होते. यावर मंत्री सामंत यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास त्वरीत अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल, असे संागितले. या प्रमाणे नगराध्यक्ष मकरंदराजे िनंबाळकर यांनी समता नगर मधील न.प.वाचनालयाच्या शेजारील ४ हजार चौरस मिटर जागा उपलब्ध करून दिली. त्वरीत घोषणेची अंमलबजावणी केल्याबद्द्ल नागरिकांमध्ये अानंदाचे वातावरण पसरले आहे. सदर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला आहे. जागेचे हस्तांतरण झाल्यानंतर राज्य सरकार ने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर येत्या दोन वर्षांत सुसज्ज असे अभ्यास केंद्र सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी दिली. 

खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील व मंत्री उदय सामंत यांच्या मागणी व आश्वासनाला नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी आपल्या कृतीची जोड दिली. सदर जागा देण्याच्या कार्यवाहीसाठी आमदार कैलास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे पत्राद्वारे पाठपुरावा करुन उस्मानाबाद नगर परिषदेला जागा मागणीची कार्यवाही करण्यास सागितली.  त्या अनुषंगाने नगर परिषद उस्मानाबाद येथे 30 ऑक्टोबर 2021 रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या MPSC व UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका (लायब्ररी)  व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे बाबतचा ठराव पारित करण्यात आला.

  सदर ठरावा अन्वये नगर परिषद वाचनालया लगतची नगरपरिषद उस्मानाबादच्या मालकीची सर्वे नंबर 146 मधील 4000  चौरस मीटर एवढी जागा ही नगर परिषद उस्मानाबाद  यांनी उपलब्ध करून दिली आहे असा फलक कायमस्वरूपी असावा या अटीवर  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांना कायदेशीर बाबी पुर्ण करून सदर जागा हस्तांतरणाची कार्यवाही करणे संदर्भात त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून ठरावासह पत्र देण्यात आले.तसेच त्यांनी जागेची पाहणी देखील केली.

याप्रसंगी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या सोबत  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुंबई विभागाचे सहाय्यक कुलसचिव  टि.के. सोनवणे  , कुलसचिव डॉ. कैलास बोरसे, विभागीय संचालक औरंगाबाद डॉ. रमेश शेकोकार यांच्यासह मुख्याधिकारी  येलगट्टे उपस्थित होते.


 
Top