उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी पर्यटन विकास हाच महत्त्वाचा मुद्दा असून पर्यटन वृध्दीसाठी चांगल्या रस्त्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग व इतर विकास कामांबाबत निर्णय होण्याच्या अनुषंगाने बैठक घेण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीनजी गडकरी   यांनी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला  लातूर येथील भेटी दरम्यान दिली.

 भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आ.राणाजगजितसिंहजी पाटील व आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी  यांची लातूर येथे भेट घेतली. जिल्ह्यात महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी, येडेश्वरी, संतश्रेष्ठ श्री.गोरोबाकाका, कुंथलगिरी येथील जैन धर्मीयांचे पवित्र धार्मिक स्थळ, नळदुर्ग येथील प्रसिध्द ऐतिहासिक किल्ला यासह अनेक धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा असणारी पर्यटन स्थळे आहेत. देशभरातील अनेक भाविक भक्त व पर्यटक भेटीसाठी या ठिकाणी येतात. त्यामुळे येथे दर्जेदार रस्त्यांची आवश्यकता आहे.

 सोलापूर-धुळे महामार्गावरील उस्मानाबाद शहरातील सर्व्हीस रोडचे प्रलंबित काम, याच महामार्गावरील उस्मानाबाद शहरातील वरुडा रोड, एमआयडीसी, उपळा ता.उस्मानाबाद  व तुळजापूर येथील उड्डाण पुलावर पथदिवे बसविणे,  सोलापुर-हैद्राबाद (रा.म.मा.क्र.३६१) महामार्गावरील उस्मानाबाद जिल्हयातील अणदुर येथील उड्डानपुलासह नळदुर्ग बायपास व महामार्गावरील इतर उड्डानपुलाचे अर्धवट कामे तात्काळ पुर्ण करणे,  बार्शी-उस्मानाबाद-बोरफळ  (राज्यमार्ग क्रं.६८) मार्ग तत्वत: राष्ट्रीय महामार्ग घोषीत करण्यात आलेला असून याची दर्जोन्नती करणे,   सांगवी काटी ता.तुळजापूर येथील पालखी मार्गाची (प्रजिमा-40) दर्जोन्नती करणे तसेच तुळजापूर-नळदुर्ग रस्त्याच्या मंजूरीसह बार्शी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याची मागणी ना.नितीन  गडकरी यांच्याकडे करण्यात आली.

 सदरील मागण्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना.नितीन  गडकरी  यांनी आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यातील विकास कामांबाबत मी सकारात्मक असून जिल्ह्यातील केंद्रसरकारकडील विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

 यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष  नितीन काळे यांच्यासह प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद पाटील, मा.जि.प.सदस्य नेताजी पाटील, जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, विक्रमसिंह देशमुख, पंचायत समिती उपसभापती पप्पु शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.


 
Top