जिल्हाधिकारी यांच्या यांच्या संकल्पनेतून रस्ता अदालत सुरू


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेती, बांध व शेत रस्ता म्हटलं की गावागावात त्याचे वाद सुरू असतात. या रस्त्यावरून भावांमध्ये, भावकी मध्ये किंवा गावकऱ्यांमध्ये खूप वेळा तुंबळ हाणामारी पण होतात. हे वाद अनेक वर्षे चालत राहतात व यात शेतकरी सर्व बाजूने पिचत जातो. तो मानसिकरीत्या खचून जातो. कोर्टात खटले उभे राहतात, आर्थिक ताण, नैराश्यातून शेतकरयांनी आत्महत्या केलेल्या ही घटना मागील काही वर्षांत समोर आलेल्या आहेत.

 गेल्या वर्षभरात शिवार हेल्पलाइनवर शेत रस्ता वादाचे २५६ कॉल आलेले आहेत, त्यापैकी सर्वाधिक फोन हे कळंब तालुक्यातून असून उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा तालुक्यातील प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे. संबंधित जिल्हा यंत्रणेशी हे प्रश्न चर्चा करून सोडवण्याची कार्यवाही सुरू आहे.

जिल्ह्यातील शेत रस्त्याचा संघर्ष थांबवण्यासाठी “रस्ता अदालत” या नाविन्यपूर्ण उपक्रमातुन शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हाती घेतली आहे. या मोहिमेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा व शेत रस्त्याच्या अडचणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे येऊन त्याचे प्रश्र्न मार्गी लागावेत यासाठी शिवार हेल्पलाईन ८९५५७७१११५ ला संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशन चे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.

  यासाठी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय ,तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

 
Top