उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नळदुर्ग शिवारातील चिकुंद्रा पुलाजवळ कार मधील दोन प्रवाशांनी आंध्र प्रदेशातील कार चालक फजल शेख यास शनिवारी (दि.२०) धमकावत मोबाईल, कारसह रोख सहा हजार रुपये असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लुटला होता. नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने ४८ तासात चोरांना जेरबंद केले.

या बाबत अधिक माहिती अशी की, दोन अज्ञात इसमानी हैदराबाद येथून नळदुर्गला जाण्यासाठी टीएस ०७, युएच- २६९० ही कार खासगी संस्थेच्या माध्यमातून बुक केली होती. कार नळदुर्ग येथे आल्यावर दोन्ही प्रवाशांनी कार चालकाला मैलापूर येथील खंडोबा मंदिर जवळ चिकुंद्रा रोड येथे घेण्यास सांगितले. तेथे गेल्यावर चालकास खाली उतरुन देत जीवे मारण्याची धमकी दिली. खिशातील १५ हजार रुपयांचा मोबाईल, रोख रक्कम सहा हजार व कार असा ऐवज घेऊन धूम ठोकली होती. शनिवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. या बाबत हैदराबाद सन सिटी येथील कार चालक फजल फारुख शेख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बजरंग सरफाळे करत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर, काझी, जगदाळे, शेळके, कवडे, ढगारे, ठाकूर यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला. यातून यातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तुळजापूर तालुक्यातील व्हर्टी येथील चेतन चंद्रकांत राजमाने व पुणे जिल्ह्यातील हिंजवडीचा विशाल राजेंद्र मिश्रा या दोघा आरोपींना मंगळवारी व्हर्टी येथून ताब्यात घेतले. लुटीच्या मालातील कार, कारसह गुन्हा करण्यास वापरलेली दुसरी कार क्रमांक एमएच- १२, एनएक्स- ३२६० त्यांच्या ताब्यातून जप्त केली.


 
Top