उस्मानाबाद /प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी आलेल्या रकमेचे वाटप सुरू करण्यात आले असून सोमवारी पहिल्याच दिवशी 237 कोटींपैकी 210 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान स्वरूपात जमा करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार कैलास पाटील यांनी दिली. जवळपास 89 टक्के शेतकऱ्यांना नुकसानीची मदत बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे, उर्वरित रक्कम दिवाळी पूर्वी वाटप करण्यात येणार आहे. वाशी तालुक्यात 100 टक्के वाटप करण्यात आले आहे तर उस्मानाबाद तालुक्यात 89, तुळजापूर तालुक्यात 83,उमरगा तालुक्यात 90,लोहारा तालुका 90,भूम तालुका 80, परंडा तालुका 72 व कळंब तालुक्यात 99 टक्के वाटप करण्यात आले आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 237 कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही मदत दिल्याबद्दल आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री आमदार डॉ तानाजीराव सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता त्याला यश आले असुन शेतकऱ्यांना या मदतीने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने निकषाबाहेर जाऊन 316 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती यातील 75 टक्के म्हणजेच 237 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्यात येत आहेत.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार 217 कोटी रुपयांची मदत देय होती, त्यात राज्य शासनाने 99 कोटी 46 लाख रुपयांच्या वाढीव निधीची भर घातली आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील 4 लाख 55 हजार 406 शेतकरी मदत मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील 4 लाख 42 हजार 545 शेतकऱ्यांचे 3 लाख 5 हजार हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाले तर 10 हजार 231 शेतकऱ्यांचे 5 हजार 475 हेकटर बागायत क्षेत्राचे नुकसान झाले. 2 हजार 630 शेतकऱ्यांचे 1 हजार 119 हेकटर बहुवार्षिक क्षेत्राचे नुकसान झाले अशा प्रकारे 4 लाख 55 हजार 406 शेतकऱ्यांचे 3 लाख 12 हजार 407 हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले.

 
Top