उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उत्तरप्रदेशमध्ये भाजप मंत्र्यांच्या पुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडूनही त्याला अटक केली जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसपक्षासह अन्य महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या वतीने सोमवारी (दि. ११) जिल्हा बंद करण्यात येणार आहे. आंदोलनाची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, सिनेट सदस्य संजय निंबाळकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नेत्यांनी भाजपवर टिकास्त्र सोडत आंदोलनाची माहिती दिली.

आंदोलनाला सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. सायंकाळपर्यंत सर्व दुकाने, व्यापार, बाजारपेठा बंद ठेवण्यात येतील. जिल्ह्यात विविध ठिकाणी अगदी शांततापूर्ण मार्गाने सर्व पक्षाचे कार्यकर्ते आवाहन करत फिरणार आहेत. यासर्व आंदोलनामधून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार आहेत. भाजप मंत्र्याच्या व सरकारच्या बेबंदशाही व हिटलरशाहीला विरोध म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे नाहीत. याच्या विरोधात एक वर्षापासून शेतकऱ्याचे आंदोलन होत आहे. तरीही सरकार निर्णय घेत नाही. यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. या बंदच्या आंदोलनात सर्वस्तरातील व घटकातील आंदोलकांनी सहभाग नोंदवावा, असे अावाहनही सर्व पक्षिय नेत्यांच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top