कळंब / प्रतिनिधी-

 तालुक्यामध्ये दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत साजरा होत असलेल्या ‘’आजादी का अमृत महोत्सव’’ अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) च्या अनुषंगाने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कळंब व विधीज्ञ मंडळ कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२१ रोजी दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब या ठिकाणी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर सेवा) योजना २०१६ या विषयावर माहिती देण्यासाठी कायदेशीर जागरूकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

 सदरील शिबीरामध्ये दुसरे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्रीमती आर. आर. कुलकर्णी मॅडम यांनी सध्याच्या युगात समाजातील जेष्ठ नागरिकांना वाढत्या वयात येत असलेल्या समस्यांविषयी माहिती देऊन आजच्या  युवापीढीकडून वरिष्ठांना जो मान-सन्मान मिळत नाही, वरिष्ठ नागरिकांची जी हेळसांड होत आहे त्यासाठी असलेल्या पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा २००७ (The Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act 2007) कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही जाती-धर्माचा व्यक्ती असो त्याने घरातील जेष्ठांना मानाची वागणूक देऊन मरेपर्यंत त्यांचा सांभाळ करण्याचे आवाहन आजच्या युवापीढीला केले. तत्पूर्वी सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कळंब येथील जेष्ठ विधीज्ञ अॅड. श्री. त्रिंबक मनगिरे यांनी वरिष्ठ नागरिकांच्या अधिकाराविषयी मुलभूत माहिती देऊन तालुका विधी सेवा समितीद्वारे वरिष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जागरूकता शिबीराचे कौतुक केले. तसेच तालुका विधी सेवा समितीतर्फे विविध विषयांवर जागरूकता शिबीराचे आयोजन करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या अनुषंगाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महेश ठाेंबरे यांनी “वृद्धपणाची गती वेगाने वाढू लागली Iआयुष्याची वजाबाकी मांडून बघितली II कळेना एवढी वर्ष कशी ती गेली I उमजेना संसार गाडी कशी रेटली II” या कवितेच्या माध्यमातून जेष्ठांच्या विविध समस्या उपस्थितांसमोर मांडून तरूण वर्गातील मुलांनी जेष्ठ नागरिकांची काळजी घेणेबाबत आवाहन केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचलन अॅड. श्रीमती एस. आर. फाटक मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. श्री. बी. एच. वाघमोडे यांनी केले. सदरील जागरूकता शिबीरासाठी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महेश ठाेंबरे, सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महंतेश कुडते तसेच विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री. मंदार मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे सदरील कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी डी. के. कुलकर्णी सर, महादेव महाराज आडसूळ, डॉ. माणिकराव डिकले, प्रकाश भडंगे, विलास मिटकरी, भास्करराव सोनवणे, मधुकर शिलवंत सर, माधवसिंग राजपूर, सुरेश टेकाळे तसेच न्यायालयीन कर्मचारी, विधीज्ञ व नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित होते.  सदरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी वरिष्ठ लिपीक सुनील परदेशी, कनिष्ठ लिपीक इरफान मुल्ला, शिपाई सावनकुमान धामनगे, लवांडे, संतोष भांडे, सोनवणे यांनी परिश्रम घेतले.


 
Top