उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे शहरातील विजय चौकात मंगळवारी (दि. १९) रात्री १०.३० ला तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे १५० जणांच्या जमावाने परिसरातील घरांवर दगडफेक करत काही वाहनांचीही तोडफोड केली. तसेच वाहनांना घेरावो घालून पोलिसांच्या ताफ्यावरही हल्ला केला. यामध्ये एका अधिकाऱ्यासह आठ पोलिस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, चार हल्लेखोरांना पकडण्यात आले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आता तणाव पूर्णपणे निवळला आहे.

उस्मानाबाद येथील आकाश चौधरी याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने कारवाईच्या मागणीसाठी शहर पोलिस ठाण्यात बिलाल खलील शेख, बब्बु मुजावर, फय्याज शेख, असलम शेख, अकबर मुजावर, ईस्माईल शेख, बाबा मुजावर, जाफर मुजावर, शहानवाज पटेल, बबलु बागवान, शाहबाज शेख, तौफीक शेख, इरशाद शेख, असलम मुजावर, सद्दाम मुजावर, इरशाद शेख, सैफ शेख, अमन शेख, फारुक शेख, शुकूर मनियार (सर्व रा. उस्मानाबाद) यांच्यासह सुमारे ८० व्यक्तींचा जमाव आला होता. यावेळी पोलिस पथकाने प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आकाश चौधरीचा शोध घेतला असता तो पथकास न आढळल्याने पथक पोलिस ठाण्यात शासकीय वाहनाने परत आले. यावेळी आकाश हा पोलिस वाहनात असल्याचा जमावाचा समज झाल्याने त्यांनी पोलिस वाहनास घेराव करुन वाहनावर बुक्या, दगड मारण्यास सुरुवात केली. यावर पोलिसांनी जमावास समजावून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर जमावातील लोक विजय चौकाच्या दिशेने निघून गेले. यावर तो जमाव विजय चौकात जाउन गोंधळ करण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी पोलिस मुख्यालयातील दंगा काबू पथकासह विजय चौकात गेले असता त्या ठिकाणी सुमारे १५० लोकांनी बेकायदेशीर जमाव जमूवन परिसरातील घरांवर दगड फेक करुन आरडाओरड करत तसेच शिवीगाळ करत असल्याचे दिसले. यावर पोलसांनी पोलिस वाहनावरील ध्वनीक्षेपकाद्वारे जमावाला प्रबोधन करून सोशल माध्यमावरील त्या प्रकरणातील संबंधीतावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परंतु, जमाव ऐकत नसल्याने पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाजवी बळाचा वापर करुन जमावास पांगविले. दरम्यान, दगडफेकीत पोलिसांच्या व खासगी वाहनांचे नुकसान झाले. सध्या तणाव निवळला आहे.


 
Top