उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ऐन दिवाळीच्या तोंडावर लोहमार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू करण्यात आला आहे. यामुळे उस्मानबादमार्गे मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या सर्व चारही रेल्वेच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. गुरुवारपासून (दि. १४) या फेऱ्या बंद असून २८ ऑक्टोबरपर्यंत त्या बंद राहतील. यामुळे उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यातील प्रवाशांची गोची झाली आहे. अनेक चाकरमाने या कालावधीतच आपल्या गावाकडे परतत असतात. त्यांना आता भाड्याचा अधिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दरम्यान, मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळानेही नियोजन केले असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून मुंबई, पुण्याच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.

लोहमार्गाचे दुहेरीकरण व अन्य किरकोळ कामांसाठी तब्बल १४ दिवसांचा मेगाब्लॉक रेल्वेने सुरू केला आहे. याचा परिणाम रेल्वेच्या नियमित वाहतुकीवर झाला आहे. तब्बल १४ ये - जा करणाऱ्या रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून ३३ रेल्वेच्या फेऱ्या मुळ मार्गावरून अन्यत्र वळवण्यात आल्या आहेत. तसेच दोन रेल्वेच्या फेऱ्या अंशत: वळवण्यात आल्या आहेत.


 
Top