तुळजापूर  / प्रतिनिधी-

 सुरत गावातील महिला ग्रामपंचायत सदस्यानी शासकीय जागेत केलेल्या अतिक्रमण काढण्यात यावे आणि रस्ता नालीच्या बांधकामातील भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी यासाठी सुरतगाव येथे ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

 ग्रामपंचायत सदस्य भामाबाई मरगु देवकर यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे अशी तक्रार गणेश बब्रुवान गुंड यांनी २ जुलै २०२१ ला जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे  दिलेली आहे. तर प्रभाग क्रमांक २ मध्ये भीम नगर भागात तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता अंदाज पत्रकापेक्षा कमी करण्यात आलेला आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. सरपंच द्रोपदी प्रकाश गुंड यांना प्रशासन अभय देत असल्याचा आरोप गावातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारे गणेश बब्रुवान गुंड आणि शहाजी सुरते यांनी केला आहे. यासंदर्भात खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपले मत मांडले आहे.

 जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले यांनी प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जानुसार कोणतीही ठोस कारवाई न करता तक्रार दार यांना उपोषण करू नये असा कागदोपत्री सल्ला दिलेला आहे.

 ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी गावस्तरावर केलेला भ्रष्टाचार त्याची वसुली झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असे मत राजेंद्र सुरते,गणेश गुंड, दादासाहेब घोडके आणि गडाजी येळणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे. तुळजापूरचे गट विकास अधिकारी ग्रामसेवक हे भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


 
Top