उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार ने ५० टक्के खर्च मिळणे आवश्यक असून शिवसेनेचे सरकार हाथ आखडता का घेत आहेत, असा प्रश्न तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर रेल्वे बोर्डाने प्रेशर निर्माण केल्यानंतरच सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला गती येईल, असे शिवसेनेचे म्हणण्े आहे. भाजप-शिवसेनेच्या या वाद-विवादावरून रेल्वे मार्गांचे राजकारण मात्र जिल्हयात तापले आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा ५०% हिस्सा दिला जात नसल्याने परंतु राज्यातील इतर रेल्वे प्रकल्पांना आर्थिक तरतूद केली जात असल्याने शिवसेना उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाबतीतच आखडता हात का घेतेय ? हा प्रश्न आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केला आहे व मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांना केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारने देखील आपल्या हिश्याची रक्कम द्यावी ही पुनश्च आग्रही मागणी केली आहे.

  सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी राज्याच्या हिस्स्याच्या रक्कमेची तरतूद करावी यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील मागील २२ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मार्च २०२१ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना नेते परिवहनमंत्री ना.अनिल परब यांनी ‘सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे संपूर्णतः केंद्र शासनाच्या आर्थिक सहभागाने होणार असल्याने राज्य शासनाने निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’ असे धक्कादायक, धादांत खोटे उत्तर दिले आहे. परिवहन मंत्री यांना त्यांची चूक निदर्शनास आणून देत राज्य शासनाचे संबंधित अधिकारी व रेल्वे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक लावण्याची वारंवार मागणी करूनही परिवहन मंत्र्यांनी याबाबत अद्याप साधी बैठक लावण्याचीही तसदी घेतली नाही.

पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाला मंजुरी देत सन २०१९ मध्ये या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन केले होते. राज्यातील इतर रेल्वे मार्गाच्या प्रकल्पा प्रमाणे केंद्र शासनाचा ५०% व राज्य सरकारचा ५०% हिस्सा या प्रमाणे रु. ९०४.३२ कोटी अंदाजपत्रकीय किमतीच्या  एकूण ८४.४४ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गास मंजुरी देण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी या प्रकल्पाचा ५०% हिस्सा उचलण्यास सहमती कळविली होती. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये या प्रकल्पासाठी रु.२२ कोटीची तरतूद केली आहे व प्रकल्पाचे काम सुरळीतपणे सुरु रहावे यासाठी सम प्रमाणातील राज्याच्या हिस्स्याच्या रकमेची मागणी रेल्वे विभागाचे मुख्य अभियंता (बांधकाम) यांनी प्रधान सचिव, गृह (परिवहन व बंदरे) यांच्याकडे केली आहे.  

 राज्य सरकारने नाशिक-नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी रु.१६१३९ कोटींच्या निम्मी तरतूद केली आहे, बीड - परळी लाही निधी दिला आहे. मात्र, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी मागील दोन वर्षात कवडीचीही तरतूद करण्यात आली नाही. या रेल्वे मार्गाच्या भू-संपादनाच्या कामास सुरुवात झाली असून उस्मानाबाद साठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या प्रकल्पासाठी राज्याच्या हिश्याची रक्कम रेल्वे बोर्डाकडे वर्ग केली जात नसल्यामुळे या प्रकल्पाचे काम अत्यंत संथपणे सुरु आहे.

रेल्वे बोर्डांचे प्रेशर नाही

मध्य रेल्वे विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी रेल्वे बोर्डाकडून रेल्वे प्रशासनावर प्रेशर आल्याशिवाय या मार्गाला गती मिळणार नाही. सध्या जे कांही कामे चालू आहेत. ते प्रशासकीय पातळीवर चालू आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील भुसंपादनाच्या मोजमाप करण्यासाठी पुढील आठवड्यात २२ लाख २८ हजार रुपये भरण्यात येणार आहेत. त्यानंतर एक महिन्यांनी शिंगोली- उपळा या भागातून रेल्वे मार्गासाठी भू-संपादन केले जाईल, असे सांगितले. 


 
Top