उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमच्या काळात मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हयाला ८०० कोटीचा विमा मिळाला होता. परंतू  गतवर्षी पुर्ण  महाराष्ट्रालाच ७०० कोटीचा विमा मिळालेला आहे.  गेल्यावर्षींचे अनुदान आणि विमा  व यावर्षीचे अनुदान ही मिळाले नाही. शेतकऱ्यांची आज फार मोठी वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे सरकार ने दसऱ्याच्या पुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट तातडीने मदत जमा करावी.जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना मदत करीत नाही तोपर्यंत सरकारला झोपू देणार नाही, असा इशाराच विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी, चिखली पाटी, दाऊतपूर, तेर परिसराची पहाणी  सोमवार दि. ४ ऑक्टोबर रोजी केल्यानंतर सरकारला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून आपण मराठवाड्याचा दौरा करीत आहोत.अत्यंत वाईट अवस्था शेतीची झाली आहे. सोयाबीन जागेवरच कुजले आहे. तुर, कापूस, ऊस याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेत दुरूस्त करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी दहावी फेल विमा प्रतिनिधी नियुक्त केले आहेत, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना शेतातील कांही कळत नाही हे लोक ५०० रुपये दिले तर ६० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दाखवितो नाही तर २० टक्के नुकसान दाखवितो, असे सांगत असल्याचे सांगितले. आमच्या काळात एका-एका जिल्हयाला ८०० कोटी रूपयंाचा विमा मिळवून दिला होता. परंतू गेल्यावर्षी या सरकार ने पुर्ण महाराष्ट्राला ७०० कोटी रुपये विमा मिळवून दिला आहे. आम्ही ज्यांनी विमा हप्ता भरला नाही, त्यांना ५० टक्के रक्कम अनुदानापोटी दिली होती. परंतू हे सरकार कांहीच करत नसल्याबद्दल शेतकरी वर्गांत तीव्र संताप आहे, अशा परिस्थितीमध्ये सुध्दा शेतकऱ्यांचे विज बिल कापले जात आहे. तर कर्ज वसूलीसाठी तगादा लावला जात आहे. सरकार ने हे थांबवावे आणी त्वरीत दसऱ्यापुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करावेत, नसता सरकारला झोपू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी सरकारला दिला आहे.

यावेळी फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. अनिल काळे आदी उपस्थित होते. 

 
Top