उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे ४ लाख ५५ हजार ४०६ शेतकऱ्यांच्या ३ लाख १२ हजार ४०६.५८ हेक्टर  पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र अद्यापपर्यंत देखील  राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीसाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतुद केलेली नाही, किंवा मदतीची घोषणा देखील केली नाही, उद्या दि. १३ ऑक्टोबर रोजी मंत्री मंडळाची तिसरी बैठक होणार आहे. या बैठकीत किमान शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निर्णय घेऊन योग्य निधीची तरतुद करावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. दरम्यान जर या बैठकीत निर्णय व निधीची तरतुद करण्यास टाळाटाळ केली तर उद्या दि. १४ ऑक्टोबरपासून राज्य सरकार विरोधात भाजपाच्यावतीने देता की, जाता हे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

शहरातील प्रतिष्ठाण भवन भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा समन्वय नेताजी पाटील, सरचिटणीस नितीन भोसले, निहाल काझी, विजय दंडनाईक, अभय इंगळे आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना अामदार पाटील म्हणाले की, दि. ९ जुलै रोजी बेंबळी व पाडोळी या भागात पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या अनुषंगाने अद्यापही शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही. त्यानंतर २५ दिवसांचा पावसाचा खंड पडला त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रीम २५ टक्के पीकविमा रक्कम देण्याचे आदेश काढले. त्यालाही २५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. शेतकऱ्यांना एक रुपया देखील देण्यात आला नाही. तर सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेत जमिनीचे तसेच जनावरे व घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र अद्याप ही राज्य सरकारने या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीची घोषणा केलेली नाही तर खरीप २०२० बाबतीत देखील न्यायालयात सुनावणी दरम्यान राज्य सरकारने आपले म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे ठाकरे सरकारचा बेजबाबदार व असंवेदनशीलपणा िदसून येत असल्याचा गंभीर आरोप ही त्यांनी केला. तत्कालीन फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीपट्टीने मदत केली होती. मात्र ठाकरे  सरकार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कोणतीची भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे नुकसानग्रस्त भागातील अल्पभुधारक शेतकऱ्यांबरोबर बहुभुधारक शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या मंत्र्यांची वाट पाहतोय !

जिल्हयातील शेतकरी अडचणीत व संकटात सापडलेले असतानाही िशवसेनेचे एकहीमंत्री पाहणी करण्यासाठी जिल्हयात फिरकले नाहीत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचे, कृर्षीमंत्री शिवसेनेचे व जिल्हयाचे पालकमंत्री देखील शिवसेनेचे आहेत, मात्र यापैंकी,श्ेतकऱ्यांचे नुकसान पाहण्यासाठी एकही मंत्री फिरकले नाहीत.  शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हयात आम्ही फिरकू देणार नाही, आम्ही त्यांच्या येण्याची वाट पाहतोय पाहतोय असा गर्भीत इशारा त्यांनी दिला. 

 
Top