उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष उस्मानाबाद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘ग्रामदुर्गा’ पोस्टरचे अनावरण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.                              

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती  प्रांजल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून उमेद अभियानांतर्गत यशस्वी उद्योजिका म्हणून  पुढे आलेल्या ग्रामीण भागातील महिलांच्या तसेच प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करत स्वतःच हक्काचं घर मिळविलेल्या महिलांच्या यशोगाथा पोस्टर स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आल्या. यावेळी महिलांनी असंख्य अडचणी आल्या तरी  दगमागून न जाता अडचणींचा सामना करत सक्षमपणे, कोणताही न्युनगंड न बाळगता पुढे येऊन यश संपादन केले पाहिजे तसेच आपल्या कुटुंबाचा आधार बनलं पाहिजे तसेच उमेद अंतर्गत महिलांनी आपल्याला मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या गावातील इतर महिलांना देखील करून द्यावा, स्वतःचे उद्योग उभे करावेत,   असे आवाहन श्रीमती  कांबळे यांनी केले. 

उमेद अंतर्गत महिला सक्षमीकरणाचे आणि  महिलांच्या माध्यमाततून शाश्वत उपजीविका मिळविण्याचे काम उस्मानाबाद जिल्हयात मोठ्या जोमाने सुरु आहे . आगामी काळात महिलांचे बाजारपेठेशी स्पर्धा करतील अशा उद्योगांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती श्रीमती  शिंदे यांनी दिली . 

उमेद अभियानामुळे महिलांना वेगळीच ताकद मिळाली आहे . महिला कोणत्याच अडचणीना घाबरत नसल्याचे सांजा येथील समुदाय संसाधन व्यक्ती संध्या सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ.बलवीर मुंडे, लेखाधिकारी आप्पासो पवार, जिल्हा प्रोग्रामर मेघराज पवार, जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड, अमोल सिरसट, गोरक्षनाथ भांगे, तालुका अभियान व्यवस्थापक पुजा घोगरे, तालुका व्यवस्थापक नागेश काकडे, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेदचे कर्मचारी व स्वयंसहाय्यता समुहातील महिला उपस्थित होत्या.   मेघराज पवार यांनी आभार मानले.

 
Top