परंडा / प्रतिनिधी : -

उद्योजक मानसिंह (बाबा) ठाकूर (वय ८०) यांचे सोमवारी मध्यरात्री ३ वाजता पुणे येथील गॅलक्सी रुग्णालयामध्ये  हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी बाऊची मार्गावरील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात करण्यात आले.

   परंडा शहर व तालुक्यात ‘बाबा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ठाकूर यांच्या मागे पत्नी पद्मावती, मुलगा भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, नगरसेवक सुबोधसिंह ठाकुर यांच्यासह सुहाससिंह ठाकुर, मुलगी सुनीता ठाकूर  दोन भाऊ, दोन बहीण, सात  नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

     (कै.) ठाकूर गेल्या दोन महिन्यापासून पोट विकाराच्या आजाराने त्रस्त होते. मध्यंतरी त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे उपचारासाठी त्यांना पुणे येथील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असतानाच काल सोमवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यावेळी पुत्र नगरसेवक सुबोधसिंह ठाकुर, कन्या व जवळचे नातेवाईक त्यांच्यासमवेत होते. (कै.) ठाकुर यांचे पार्थिव आज दुपारी रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आले.  त्यानंतर  दुपारी  त्यांच्या पार्थिवावर बाऊची मार्गावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात करण्यात आले.

 या वेळी आ.अभिमन्यु पवार, शिवसेनेचे अनिल खोचरे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, भाजप नेते अॅड. मिलींद पाटील, माजी नगराध्यक्ष सुभासिंह सिध्दीवाल,   जि.प.चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, दत्ता कुलकर्णी, अॅड.अनिल काळे, अॅड.नितीन भोसले, दादासाहेब खरसडे, मुकूंद देशमुख, संतोष बोबडे, संताजी चालुक्य,      गौतम लटके, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रामदास कोळगे यांच्यासह जिल्हयातील भाजपाचे नेते तसेच सर्व पक्षीय नेते व तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यापारी वाहतूक क्षेत्रासह उद्योग व्यवसायात कै. मानसिंह ठाकूर यांनी दीर्घकाळ काम पाहिले आहे. त्यांच्या या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
Top