शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हाबंदी -राणा पाटील : 

अडवायचा प्रयत्न करून बघा-कैलास पाटील : 


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकऱ्यांना गतवर्षीचा विमा नाही, यावर्षीचा अग्रिमही नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार आणि तीन अामदार असताना शिवसेनेने केले काय, असा प्रश्न उपस्थित करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रत्रिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, तुळजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार कैलास पाटील यांनी केवळ रस्ता अडवायचा प्रयत्न तर करून पाहा, असे थेट आव्हान देत भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचा दावा केला आहे.

दोन्ही आमदारांनी शुक्रवारी पत्रक काढून आराेप, प्रत्यारोप केले आहेत. यामध्ये अामदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने सातत्याने अन्याय केलेला आहे. शिवसेनेचे जिल्ह्यात तीन आमदार आणि एक खासदार असताना देखील खरीप २०२० चा मंजूर विमा बाधित शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळालेला नाही. ८० टक्के शेतकरी हक्काच्या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. रब्बीचा विमा देखील मिळालेला नाही, खरीप २०२१ च्या अग्रिम विम्याचे आदेश होवून देखील प्रत्यक्षात काहीच कृती नाही आणि यात आताच्या नुकसानदायी अतिवृष्टीची भर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ते आर्थिक संकटात आहेत. मग शिवसेना नेमकी शेतकऱ्यांसाठी काय करत आहे, येत्या ७ दिवसांत पिक विम्याबाबत सकारात्मक कृती करावी अन्यथा शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हा बंदी करून जाब विचारण्याचे काम शेतकऱ्यांसह भाजप करेल असा इशारा दिला.

यावर सेना आमदार कैलास पाटील म्हणाले की, भाजपचे केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे सिध्द होत असल्याचे लक्षात येऊ लागल्यावर पत्रक काढुन शिवसेनेवर आरोप करण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न आहे. शिवसेनेला हिशोब मागायची किमान तुमच्यात नैतिकता उरली नाही. तुमच्या ४० वर्षाच्या कारभाराचाही लेखाजोखा मांडलात तर जनतेलाही बर वाटेल. जिल्ह्यात ४० वर्षात विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचे काम शिवसेनेच्या फक्त दोन वर्षाच्या सत्तेत होत आहे, याचा तुम्हाला पोटशुळ सुटला आहे. शिवसेनेच्या मंत्र्याचा रस्ता आडवायचा नुसता प्रयत्न तरी करुन बघा, मग समजेल पत्रक काढण्याइतक ते सोप आहे का, असेही प्रतिआव्हान त्यांनी पत्रकात आमदार राणा पाटील यांना दिले.

 
Top