तेर ( प्रतिनिधी)  महाराष्ट्र शासन महसूल व कृषी विभागाच्यावतीने यावर्षी पासून ई पीक पाहणी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. 'माझी शेती माझा सातबारा मीच नोंद घेणार माझा पिक पेरा' या घोषवाक्य च्या आधारे सदरील प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकरी स्वतः चा पिक पेरा मोबाईल ॲप मध्ये नोंद करणार आहेत. हा प्रकल्प संपूर्ण  महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात या प्रकल्पाची सुरुवात 15 ऑगस्टपासून सुरू झाली असून 30 सप्टेंबर पर्यंत या प्रकल्पांतर्गत शेतकरी आपला पिक पेरा नोंदवू शकतील.

   उस्मानाबाद तालुक्यातील  मौजे वाणेवाडी येथे पालक अधिकारी म्हणून कृषी सहाय्यक  लेणेकर व्ही. पी. यांची नेमणूक करण्यात आली होती.  लेंनेकर यांनी शेतकऱ्यांमध्ये इ पीक पाहणी  याबद्दल जनजागृती केली. व्हाट्सअप ग्रुप चा वापर करून शेतकऱ्यांना ई पिक पाहणी ॲप बद्दल माहिती सांगितली तसेच गावातील विविध आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, प्रगतशील शेतकरी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये ई पीक पाहणी याबद्दल सकारात्मकता निर्माण केली. याचा परिणाम म्हणून मौजे वानेवाडी  हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील 100% ई पीक पाहणी ॲप द्वारे पिक पेरा नोंदविणारे पहिले गाव  ठरले आहे. या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना लेनेकर म्हणाले की, गावातील सर्व शेतकऱ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद व सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या प्रोत्साहन , मार्गदर्शनामुळे  तसेच तलाठी रेश्मा पाटील यांच्या सहकार्यामुळे हे उद्दिष्ट साध्य करु शकलो . यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार गणेश माळी, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, नायब तहसीलदार तुषार बोरकर, मंडळ कृषी अधिकारी सत्यजित देशमुख, कृषी पर्यवेक्षक माजिद शेख उपस्थित होते.
 
Top