उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अक्षता पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी नववधू विवाहातील दागिन्यांसह पसार झाली होती. ७२ तासात आंबी पोलिस ठाण्याच्या पथकाने गतीमान तपास करत नववधूसह चौघांना दागिन्यांसह नांदेड येथून अटक केली आहे.

भूम तालुक्यातील आंबी येथील विश्वनाथ भोसले या तरुणाचा विवाह नांदेड येथील एका तरुणीसोबत १८ सप्टेंबर रोजी मोजक्या लोकांसमक्ष झाला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी लघुशंकेच्या बहाण्याने ती नववधू विवाहातील दागिन्यांसह तिच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पसार झाली. यावरुन आंबी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. आंबी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल पाटील, पोलिस नाईक लक्ष्मण माने, सिध्देशवर शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल सतीश राऊत, रामकिसन कुंभार, प्रभु, कातुरे, साबिया शेख यांच्या पथकाने गतिमान तपास केला. यातून बनावट वधू पूजा ओढणे, आप्पा भांगे, शुभम दवणे, नारायण सोनटक्के अशा चौघांना विवाहातील दागिन्यांसह नांदेड येथून अटक केली आहे. हा विवाह नांदेड येथीलच एकाच व्यक्तीच्या मध्यस्तीने करण्यात आला होता. त्याने पैसे घेऊन आंबी येथील दोन ते तीन युवकांचे लग्न लावल्याची परिसरात चर्चा आहे.


 
Top