उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सि ता जि उस्मानाबाद येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत १९७५ -१९७६ पासून रुग्ण सेवेसाठी कार्यान्वित आहे.प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या दुरुस्तीचे काम करून लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत मात्र निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे लाखो रुपये पाण्यात गेलेले आहेत संपूर्ण इमारतीला गळती लागल्याने आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांची खोली,औषध वाटप व नोंदणी कक्ष,प्रसूतीगृह,अशा विविध विभागांमध्ये पाण्याची गळती होत असल्याने मुसळधार पाऊस झाल्याने आरोग्य उपकेंद्रात पाणीच पाणी झाले आहे.

आरोग्य उपकेंद्राच्या छप्परातून गळती होत असल्याने स्लॅब कोसळण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.अशा परिस्थितीत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून रुग्णांची सेवा करावी लागत आहे.महामार्गावर होणारे अपघात तसेच आपत्कालीन स्थितीत हे आरोग्य उपकेंद्र महत्वाची भूमिका बजावत आहे जवळपास ६ गावे व १३ वाड्या वस्त्यांमधील ग्रामस्थाना वडगावचे आरोग्य उपकेंद्राचे आधार ठरत आहे.वडगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दिवसाला शंभरपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात.त्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी येथील डॉक्टर व त्यांचे सहकारी व कर्मचारी त्यांना वेळेत सेवा उपलब्ध करून देतात.मात्र आरोग्य उपकेंद्राला लागलेल्या गळतीमुळे रुग्ण आणि आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रसूतीगृहाचे छप्परही गळत असल्याने प्रसूती दरम्यान गर्भवती महिलांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.डॉक्टरांच्या केबिनमध्येही पाणी गळती होत असल्याने अनेकदा डॉक्टरांना उभे राहूनच काम करावे लागते.तर स्टोर रूम,औषधांच्या खोलीतही गळती होत असल्याने लस व औषधे ठेवलेल्या रूमला शॉक लागत असल्याने कर्मचाऱ्यांना काम करताना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे.


गजेंद्र राजेंद्र जाधव - पंचायत समिती सदस्य उस्मानाबाद

या इमारतीस ४५ वर्षांपक्षा जास्त कालावधी झाला आहे त्यामुळे गळती सारखे प्रकार घडत आहेत वेळोवेळी रुग्ण कल्याण व पंचायत समितीच्या बैठकीत या इमारतीच्या दुरुस्ती विषयी संबंधितांना वेळोवेळी कळविले आहे.या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन इमारतीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

 
Top