उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पवनचक्की उभारणी करणार्‍या सिमेन्स गमेशा या कंपनीने शिवारांमध्ये पवनचक्की उभारण्याकरिता बनावट करारपत्रे तयार करून तसेच अनेकांना अत्यल्प मोबदला देऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा आरोप करत अ‍ॅड. आशिष पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवार, 2 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. 

 याबाबत शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना 25 ऑगस्ट रोजीच निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे म्हटले होते. यापूर्वी दिनांक 15/02/2021 रोजी देखील उपोषणाचे निवेदन दिले होते. परंतु कोव्हीडची पस्थिती लक्षात घेता 29/02/2021 रोजीचे उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर 15/07/2021 रोजी उपोषण संदर्भात निवेदन दिले असता 22/07/2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शेतकर्‍यांना व सदर कंपनीस मोबदल्याच्या तफावती दूर करून अडचणी मार्गी लावण्यास सांगितल्या. परंतु सदर कंपनीने शेतकर्‍यांशी कोणताही संपर्क होऊ न देता उलट शेतकर्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे शेतकर्‍यांनी निवेदनात म्हटले आहे.तसेच शेतामध्ये बेकायदेशीर उभारलेले पोल आम्ही काढून टाकणार असल्याचेही शेतकर्‍यांनी म्हटले आहे.

 निवेदनावर अँड अशिष पाटील, युवराज शंकरप्पा तोडकरी, राम गणा गंगणे, शेषराव गजेंद्र सूर्यवंशी, महादेव खेेळे, मारूती सौदागर माने, संजय धनराज माने, भैरवनाथ रामराव ढोबळे, शिवाजी लकडे, रशीदमहंमद शेख, दत्तू बाबुराव झिंगे, दत्तात्रय लोखंडे आदी शेतकर्‍यांच्या स्वाक्षरी असून जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी उपोषण आंदोलनात सहभाग नोंदवला.

 
Top