उस्मानाबाद / प्रतिनिधी -

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महाआवास अभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत आवास योजना विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, उस्मानाबाद झेडपी अध्यक्षा अस्मिता कांबळे,सहायक उपायुक्त (विकास) विना सुपेकर, विभागातील सर्व झेडपी सीईओ, गट विकास अधिकारी, पंंंस. सभापती, सरपंच, ग्रामसेवक, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सदर सोहळ्यात एकूण २४ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.त्यापैकी एकूण ६ पुरस्कार जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत.

महाआवास अभियान ग्रामीणमध्ये जिल्हा परिषद सर्वोत्कृष्ट येण्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे, जिल्हा प्रोग्रामर मेघराज पवार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान आहे. केंद्रेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार वाटप करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे व जिल्हा प्रोग्रामर मेघराज पवार उपस्थित होते. तसेच राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेमध्ये विभागात पंचायत समिती (लोहारा) यांना द्वितीय तर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वाशी पंचायत समितीला विभागात तृतीयस्थानी आल्याबद्दल पुरस्कारीत करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाने ग्रामपंचायत पारगाव (ता.वाशी) व राज्य पुरस्कृत योजनेमध्ये उत्कृष्ट ग्रामपंचायतमध्ये द्वितीयस्थानी ग्रामपंचायत धानुरीने पुरस्कार पटकावला. सदर पुरस्कार घेण्यासाठी दोन्ही ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

 
Top