उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील हुतात्मा स्मारके जिल्ह्याची प्रेरणास्त्रोत आहेत. त्यामुळे त्याठिकाणी स्वच्छता ठेवून गावकर्‍यांनी त्यांचे पावित्र्य जपले पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केले. शुक्रवारी (दि.17) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त गौर येथे हुतात्मा स्मारकांना भेट देवून त्यांचा वारसांचा तसेच स्वातंत्र्य सैनिक, गुणवंत विद्यार्थी आदींचा सत्कार केला. या कार्यक्रमात ते बोलत होते.  

कळंब तालुक्यातील गौर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा  येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शाम देशमुख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारक याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गावातील मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेले हुतात्मे कै. हुतात्मा विठ्ठलराव भगवानराव पाटील, कै.हुतात्मा अंबादास गंगाधर कुलकर्णी, कै. हुतात्मा दशरथ आबा लंगडे, कै. हुतात्मा पांडुरंग लंगडे, कै. हुतात्मा रामभाऊ हरी धनगर, कै. हुतात्मा अंबादास शंभू माळी, कै. हुतात्मा पांडुरंग शिवराम धनगर या सात हुतात्म्यांच्या वारसांचा तसेच गावातील स्वातंत्र्यसैनिक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील विद्यार्थी युगंधरा धनाजी देशमुख, ओमकार अर्जुन लंगडे आणि श्रावणी रामलिंग घोंगडे यांनी मंथन स्पर्धा परीक्षेत क्रमांक मिळवल्याबद्दल पालकांसह व मार्गदर्शन श्री. रसाळ, श्रीमती कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री बांगर यांनी शाळेमध्ये चालू असलेल्या बाला उपक्रमाविषयी माहिती दिली. गावातील स्मारक हे एक ऐतिहासिक वास्तू व्हावी. यासाठी शाळा प्रयत्नशील असून बाला उपक्रमांतर्गत आपण आपल्या गावाचं नाव जिल्ह्यामध्ये पोहोचवण्याचं काम या माध्यमातून करणार आहोत असे सांगितले. यावेळी संजय पाटील दुधगावकर यांनी शाळेला बाला उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नवनाथ देशमुख यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. श्री.जावळे यांनी आभार व्यक्त केले.


 
Top