परंडा /प्रतिनिधी : -

क्रांतिकारी संत कवयित्री या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार दि.३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयात होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. श्रुतीश्री वडकबाळकर यांच्या हस्ते आणि माननीय पन्नालाल सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन समारंभ होत आहे. त्यासाठी माजी प्राचार्य डॉ.चंद्रकांत मोरे, कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष श्री.रामचंद्र इकारे (बार्शी ) साहित्यिक श्री शब्बिर मुलांनी (बार्शी )हेही उपस्थित राहणार आहेत . 

             संत काव्याचे वाचन करत असताना अनेक संत स्त्रियांच्या अभंगरचना वाचनात आल्या .अनेक मोठ मोठ्या ग्रंथातून त्यांचे अभंग वाचावयास मिळाले तेव्हा त्यांच्या रचनेतून समाजप्रबोधनासाठी त्यांनी साहित्यातून केलेले प्रयत्न छोट्या ग्रंथातून लोकांसमोर यावेत या विचारातून सात कवयित्रींच्या साहित्याचा आढावा घ्यावा असे मी मनोमन ठरविले आणि हा ग्रंथ प्रपंच केला.फक्त ४६ पानांच्या या ग्रंथातून सात संत कवयित्रींच्या कार्याचा आढावा घेतला.मा.पन्नालाल सुराणा यांनी या पुस्तिकेची प्रस्तावना दिली.आणि शेती मंडळाने हा ग्रंथ प्रकाशित करण्याचे योजिले . 

         मध्ययुगीन कालखंडातील संत कवयित्रींनी त्यांच्या काव्य लेखनातून स्त्री जीवनाच्या विविधांगावर प्रकाश टाकला आहे.मध्ययुगीन कालखंडात स्त्रियांचा समाजातील दर्जा अतिशय खालावलेला आहे. सतीप्रथा, बालविवाह ,शिक्षणास विरोध यामुळे स्त्रियांचे जीवन चार भिंतीत बंदिस्त झाले होते .अंधश्रद्धा ,अनिष्ट रूढी परंपरांनी त्यांचे जीवन कुंठित झाले होते .अशा अवस्थेतही संत कवयित्रींनी आपल्या काव्यातून समाजातील व्यथा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. 

          चातुर्वर्ण्य पद्धत, स्त्री-पुरुष विषमता ,पुरुष प्रधान संस्कृती, स्त्री शूद्रांच्या बाबतचा दृष्टिकोन या सर्वांना छेद देणारे विचार या संत स्त्रियांनी आपल्या रचनेतून मांडले. तेराव्या ते सतराव्या शतकाच्या पाचशे वर्षाच्या कालखंडात या संत कवयित्रींनी ही काव्यरचना केली आहे .त्यातून त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. 

        विधवा स्त्रियांनी पती निधनानंतर सती जाण्यापेक्षा मोक्षप्राप्तीसाठी अध्यात्माचा मार्ग आचरावा.आत्मविश्वासाने व चिंतन मनन करून विधवांनी मोक्षप्राप्तीचा मार्गाकडे वळावे अशी शिकवण संत महदाइसा ने देऊन त्या काळात हा क्रांतिकारी मांडला. संत मुक्ताबाई यांचे व्यक्तीमत्व विलक्षण  तेजस्वी होते.त्या आत्मविश्वासाने व अधिकारवाणीने बोलतात .  त्या म्हणतात, “ ज्ञानाशिवाय भक्ती व्यर्थ आहे.जर भक्तीला ज्ञानाची जोड नाही तर अशी भक्ती काय कामाची “   मुक्ताबाईच्या अभंगाचे स्वरूप एका पपरमोच्च   अशा ज्ञानानुभवाचे स्थिर दर्शन घडवते.स्त्री शूद्रांना ज्ञानाचा अधिकार नाकारलेल्या काळात मुक्ताबाईंनी हे क्रांतिकारी विचार मांडले .  

      संत जनाबाई या नामदेवाच्या घरी काबाडकष्ट करणाऱ्या दासी होत्या.पण भक्तीच्या जोरावर त्यांनी पांडुरंगाशी नाते जोडले.ईश्वर भक्त संबंध त्यांनी काव्यातून व्यक्त केला .जनाबाई या शुद्र होत्या ,दासी होत्या.त्यांच्या अभंगात तत्कालीन उच्चवर्णीय ब्राह्मण जातीने शूद्रांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल टीकेचा सूर दिसून येतो.त्यांचा स्वार्थी हेतू व त्यांच्या गैर मार्गाने संपत्ती मिळवण्याच्या पद्धतीवर जनाबाईच्या अभंगातून टीका आहे.त्यामुळे या अभंगातून क्रांतिकारी कवयित्री अशी प्रतिमा दिसून येते .

            संत जनाबाई आणि संत कान्होपात्रा या शूद्र जातीतील होत्या. शूद्र जातीत जन्माला आल्याने काय यातना भोगाव्या लागतात याचे वर्णन त्यांच्या रचनेतून व्यक्त होते. संत कान्होपात्रा ने आपल्या अभंगातून आपल्या आयुष्याच्या शोकांतिकेचे चित्रण केले आहे . 

       संत बहिणाबाई या अत्यंत बुद्धिमान ,जागृत व विविध विषयावर अधिकार मिळवलेल्या स्त्री होत्या. विधवा स्त्रियांच्या दुःखमय जीवनाच्या भावनांचे चित्रण त्यांनी ओव्यातून केले आहे .संत सोयराबाई संत निर्मलाबाई या संत कवयित्री नि आपल्या दुःखमय जीवनाची कहाणी चित्रित केली आहे.

एकंदर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील उच्चाटन झालेल्या स्त्रिया भक्तिमार्गातून पुढे आल्या आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम रूढी परंपरा ची बंधने असूनही त्यांनी त्या काळात केले. मग आजच्या विज्ञान युगात स्त्रियांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून देव-देवतांना नवससायास करण्याऐवजी आपल्या देशाच्या संविधानातील स्वातंत्र्य ,समता ,बंधुता व न्याय या मूल्यांना प्रमाण मानून निर्भयपणे व एकात्मतेने राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे यासाठी हा लेखन प्रपंच केला . 


डॉ.दीपा दिनेश सावळे (लेखिका )

 प्राचार्या,

शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय , परंडा जि.उस्मानाबाद.

 
Top