उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव धरणात करमाळा व परांडा तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांना मासेमारीसाठी परवानगी पास देण्याचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले. तसेच परप्रांतीयांना मासेमारीस प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय देताच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मच्छीमारांनी जल्लोष केला.सीना-कोळेगाव धरणामध्ये केरळ व आंध्र प्रदेश येथील मच्छीमारांना मच्छीमारीसाठी परवाना असल्याने स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे या आंदोलनाची धग दोन दिवस राहिली. अर्धनग्न, खुर्चीला मस्त्याहार, अर्धनग्न अवस्थेत चौथ्या मजल्यावर ठिय्या, यावेळी एका मच्छीमाराने विष प्राशन केले, एका महिलेने उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला, रात्रभर मुक्काम आंदोलन आणि दुसऱ्या दिवशी रक्तदान आंदोलन केले. बैठकीत मागण्या मान्य करण्यात आल्या.

ठेकेदारांवर अदखलपात्र गुन्हा 

: मत्स्यव्यवसाय कार्यालयात जनशक्ती संघटनेने आंदोलन सुरू असताना. ठेकेदार बालाजी सल्ले यांनी व्हाॅट्सअप स्टेटसला बंदूक हातामध्ये धरमन चित्र ठेवून त्याखाली ‘अगर हम मैदान मे उतरेंगे तो सारे खिलाडी अपना खेल भूल जायेंगे’ असे लिखाण केल्यामुळे मच्छीमार बांधवांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले होते. खूपसे पाटलांनी ही बाब निदर्शनास आणून देताच जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

 
Top