उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीच्या प्रतिष्ठान भवन कार्यालयात कौडगाव एमआयडसी येथील टेक्निकल टेक्स्टाईल पार्क संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी कौडगाव एमआयडीसी येथील टेक्निकल टेक्स्टाइल पार्कचा राज्यसरकारकडील प्रलंबित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १० हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यासंदर्भात निर्णय जाहीर करून उस्मानाबाद शहरासह वडगाव, उपळा,येडशी, अंबेजवळगा जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह १० हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येईल,असे स्पष्ट केले.

कौडगांव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये नॅशनल टेक्नीकल टेक्स्टाइल मिशन अंतर्गत टेक्नीकल टेक्स्टाइल पार्क उभारण्याची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरवून त्यांच्या वाढ‍दिवसानिमित्त अनोखी भेट देण्याचा संकल्प व्यक्त करत याबाबतचा दीड वर्षापासून राज्य सरकारकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव केंद्र सरकारकडे तातडीने पाठवावा यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या विनंतीवरुन तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद येथील कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्निकल टेक्स्टाइल पार्क उभारण्याची घोषणा केली होतीके.पी.एम.जी. संस्थेच्या माध्यमातून तयार केलेला प्राथमिक प्रस्ताव एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्य शासनाकडे सादर केला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हा विषय प्रलंबित आहे.

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे याबाबत बैठक घेण्याची मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी अनेकवेळा केली. परंतु त्यांची याबाबत अनास्था दिसून येते, असे भाजपने म्हटले अाहे.याप्रसंगी अॅड.अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते,उपनगराध्यक्ष अभय इंगळे,दाजीअप्पा पवार,सुजित साळुंके,नामदेव नायकल,ओम नाईकवाडी, प्रवीण सिरसाठे, नरेंद्र वाघमारे, अादी उपस्थित होते.


 
Top