उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांभोवतीचे कोरोना निर्बंधाचे पाश अखेर सैल झाले आहेत. नाशिकसह २२ जिल्ह्यांतील नागरिकांना मंगळवार, ३ ऑगस्टपासून मोकळा श्वास घेता येणार आहे. या २२ जिल्ह्यांत शॉपिंग मॉलसह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८, तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. कोरोना रुग्णवाढ असलेल्या ११ जिल्ह्यांत जैसे थे स्थिती राहणार आहे. मुंबई, उपनगर व ठाणे येथे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन निर्बंधांबाबत निर्णय घेणार आहे. रविवारी लॉकडाऊन कायम असून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानेच उघडी ठेवता येणार आहेत.

 ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याबाबतची नियमावली सोमवारी सायंकाळी जाहीर झाली. त्यानुसार सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, अहमदनगर आणि बीड या ११ जिल्ह्यांत निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन निर्णय घेईल.

 नाशिक जिल्ह्यात आदेश जसेच्या तसे लागू

शासनस्तरावरून नव्याने काही निर्देश आल्यास ते जिल्ह्यात लागू करण्याबाबत यापूर्वीच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. त्यानुसार ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाकडून सोमवारी (दि.२) प्राप्त आदेश जिल्ह्यात जसेच्या तसे लागू करण्यात येत आहेत. याची अंमलबजावणी मंगळवारपासून (दि.३) सुरू करण्यात येईल. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

 हेही ठेवा ध्यानात... बाहेर फिरताना मास्क अनिवार्यच

काही निर्बंध हटवले तरी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

 सिनेमागृहांसह धार्मिक स्थळेदेखील बंद राहणार

१. दुकाने : २२ जिल्ह्यांत शॉपिंग मॉल्ससह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत उघडी ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ती उघडी ठेवता येतील. रविवारी मात्र फक्त अत्यावश्यक सेवांची दुकानेच उघडी ठेवता येणार आहेत.

 २. सार्वजनिक ठिकाणे : उद्याने व्यायामासाठी खुली ठेवता येणार असल्याचे नव्या नियमावलीत म्हटले आहे. शेतीविषयक कामे, उद्योग, मालवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता येणार आहे.

 ३. सलून निम्म्या क्षमतेने : जिम, योगा सेंटर्स, केशकर्तनालय, स्पा ही दुकाने एसीशिवाय ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ८ वाजेपर्यंत, तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.

 ४. सिनेमागृहासह धार्मिक स्थळेदेखील बंद ठेवावी लागणार : नव्या नियमावलीनुसार, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे बंदच ठेवावी लागणार आहेत. सर्व प्रकारची धार्मिक स्थळेदेखील बंदच ठेवावी लागणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयांबाबत शिक्षण विभागाचेच निर्णय कायम राहतील.

 ५. हाॅटेल्स : राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, हॉटेल आणि रेस्तराँ हे फक्त ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र सध्या सुरू असलेली पार्सल सेवा सुरू ठेवता येईल.

 ६. कार्यालये : सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास संमती. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्यात यावी. जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरू ठेवता येऊ शकतात ती तशी ठेवली जावीत.

 ७. कार्यक्रमांना मनाई : वाढदिवस समारंभ, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन, मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम आहेत. रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

  

 
Top