उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

एका जीपसह ८ लाख ७० हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उस्मानाबादेत अवैध दारू पकडली असून,याप्रकरणी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोघांना अटक करण्यात अाली आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर करण्यात आली.

जिल्ह्यातील विविध भागात अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाया सुरू आहेत. बुधवारी मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचून कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर.एस. कोतवाल यांनी पथकासह आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ सापळा रचून अवैधरित्या विक्रीसाठी जात असलेल्या वाहनातील दारू ताब्यात घेऊन कारवाई केली. बार्शी तालुक्यातील नारीवाडी येथील बळीराम मनोहर शिंदे (३३ वर्ष) व वाहन मालक मनोहर कोरेकर यांच्या ताब्यातून गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान,या कारवाईत ट्रॅक्स कार्गो किंग स्टार (एमएच १३ सीयू ४९६२) या वाहनासह विदेशी मद्य इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की ब्रँण्डच्या ३ हजार ७२ बॉटल असलेले ४० बॉक्स, १८० मिली क्षमतेच्या विदेशी मद्य मॅकडॉल नंबर वन व्हिस्की ब्रँडच्या एकूण ३०७२ बॉटल ४० बॉक्स प्लास्टिक कॅरेट एकूण ५० असा एकूण ८ लाख ७० हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बळीराम शिंदे व इतरांविरुद्ध दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ, ड, इ ८१, ८३, ९० व १०८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक आर.एस कोतवाल, एस.आर. शिंदे, जवान एम.एस. गजधने, बी.बी. भंडारे, वाहनचालक ए.एम. सोनकांबळे यांच्या पथकाने केली.


 
Top