उस्मानाबाद (प्रतिनिधी) :- 

स्वरचित गाण्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन करण्याचा मानमरताब मिळाला. गाण्यांचे बोल रसिकाच्या काळजाला भिडल्यावर हुंदका दाटून येतो, तेव्हा जो आनंद मिळतो, तो शब्दातीत असतो, अशी भावना तालुक्यातील किणी येतील प्रबोधनकार शाहीर विकास शितोळे यांनी व्यक्त केली. ते सांजा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित ‘अण्णा तुम्हा मानवंदना’ या प्रबोधन शाहीरी जलसा कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद करीत होते. शब्द तयांचे मोती ठरले, अखंड विश्वाच्या मणी भरले...अण्णा भाऊच्या पुण्याईने, माणसाले माणूसपण मिळाले...अशी एकापेक्षा एक सरस गीते शितोळे यांनी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

तर अण्णा झाले शाहीर झाले खूप मोठे... खूप ग, डफावर देऊनिया थाप ग...हे गीत सादर करून शाहीर राजेशकुमार ननवरे यांनी उपस्थितांच्या काळजाला हात घातला. यावेळी फुले, शाहू, आंबेडकर, छ.शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करणारी अनेक गीते सादर करण्यात आली. समाजातील रूढी परंपरा, शिक्षण, जातीवाद, धर्मांधतालाही गीतातून स्पर्श केला गेला. या प्रबोधन जलसा मध्ये शाहीर विकास शितोळे, राजेशकुमार नन्नवरे यांच्यासह ढोलकीला श्रीकांत साठे, खंचिरीला मनोज चांदणे आणि कोरसला गणू पेठे, तानाजी कांबळे, शेखर चांदणे यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी तुकाराम चांदणे, प्रदीप चांदणे, बालाजी झोंबाडे, तानाजी चांदणे, अजित पेठे, संदिपान चांदणे, विकास कांबळे, सुनिल चांदणे, अभिजीत झोंबाडे, आदित्य जाधव, स्वप्निल चांदणे, स्वराज चांदणे, दत्ता पेठे, शाहिद तांबोळी, भारत चांदणे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

  गाण्यानं डोळ्यात आसवं दाटली..

 देहाची करोनी पंती, हृदयाची करोनी वात, वृक्ष समतेचा लावीला...रक्तपात न करता अण्णांनी, इथे ममता पेरली... आणि अण्णांची लेखनी थोर सा-या जगात गाजली...त्या लेखनीला पाहून भली-भली ती लाजली..या गाण्याने शाहीर विकास शितोळे यांनी सर्वाना भावूक केले. त्यामुळे सर्वांच्या डोळयात आसवं दाटली.

  नन्नवरेंचा आवाज थेट काळजात घुसला...

 साहित्याचं साज अण्णा भाऊ माझं...लेखनी ती हलवली जगाली  माझा अण्णा भाऊ रशियाला निघाला...आणि वालू आईचा लेक...अन विठू आईचा लेक, आरं दोन्ही वाघाचा वै-याला होता धाक रणी विचारांच्या अण्णा भाऊ लढला रं... गो-या लय भारी पडला माझा लहुजी रं...अशी गाणी शाहीर राजेशकुमार नन्नवरे यांनी पहाडी आवाजात सादर केल्याने त्यांचा आवाज ऐकणा-यांच्या थेट काळजात घुसला.

 

 
Top