तुळजापूर / प्रतिनिधी-

शहरातील प्राचीन मंकावती कुंड हडपण्याच्या प्रकरणात माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते देवानंद रोचकरी यांच्यावर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरविकास मंत्र्यांनी सुनावणी घेतल्यानंतर कारवाईवरील स्थगिती उठवण्यात आली. यानंतर लगेच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. मंगळवार दि. १० रोजी रात्री १० वाजता देवानंद रोचकरी, बाळासाहेब रोचकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी धडाकेबाज कार्रवाई केल्यामुळे लोकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी उ. ना. सर्दळ यांनी स्थगिती उठवल्याचे आदेश मंगळवारी दुपारी काढले. यानंतर तुळजापूर पालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे व अन्य कर्मचारी देवानंद रोचकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणी रोचकरी व अन्य आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (दि. ९) ऑनलाइन सुनावणी घेण्यात आली होती. कोणतीही नोटीस न देताच तसेच प्रतिवादीचे म्हणणे ऐकून न घेताच जिल्हाधिकाऱ्यांनी एकतर्फी निर्णय दिल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी नगरविकास मंत्र्यांकडे अपील करून कारवाईला ३ ऑगस्टला स्थगिती मिळवली होती. मूळ दस्तावेजात फेरफार करत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राचीन मंकावती कुंड नावावर केल्याचा आरोप करत महंत सावजीनाथ व इतरांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे ३१ मे रोजी तक्रार दाखल केली होती. बेकायदेशीर काम करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती.

यासाठी नियुक्ती समितीच्या अलवालावरून जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, रोचकरी यांनी यावर स्थगिती मिळवली होती. अखेर मंगळवारी दुपारी स्थगिती उठवण्यात आली. यामुळे कारवाईचा मार्ग मोकळा झाला. मंगळवारी रात्री रात्री उशिरापर्यंत मुख्याधिकारी आशिष लोकरे व पालिका कर्मचारी पोलिस ठाण्यात तळ ठोकून होेते. रात्री १० वाजता देवानंद रोचकरी आणि बाळासाहेब रोचकरी यांच्यावर कलम ४२०, ४६८ नुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 
Top