उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तेरणा साखर कारखान्याकडे ३१२ कोटी रुपये तर तुळजाभवानी साखर कारखान्याकडे १३२ कोटी रुपये थकीत असल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँक आडचणीत आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज वाटपात अडचणी निर्माण होत आहेत. भविष्य निर्वाह निधी कार्यालयासह सर्वांची परवानगी घेऊन तेरणा व तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सुरेज बिराजदार यांनी दिली. 

उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँक गेल्या अनेक वर्षांपासून तेरणा कारखाना व तुळजाभवानी कारखाना व रोखे गैरव्यवहार प्रकरणापासून प्रचंड अडचणीत आला आहे. उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक मंडळाने दोन्ही कारखाने ताब्यात घेऊन भाडेतत्वावर देण्याचा प्रयत्न केला असता थकीत भविष्य निर्वाह निधीसाठी कारखान्याचा लिलाव काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्याकडून भविष्य निर्वाह निधी व जिल्हा बँकेत तडजोड करून हायकोर्टात दाखल करण्यात आले. असे सांगून चेअरमन बिराजदार यांनी लॉकडाऊनमुळे बराच कालावधी गेला. तडजोडी प्रमाणे दोन्ही कारखाने भाडेतत्वावर देऊन जी रक्कम येईल त्यातील ५० टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात येईल, असे ठरविण्यात आले. 

आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत येत्या २४ तारखेपर्यंत दोन्ही कारखाने भाडेतत्वावर देण्यासंदर्भात नियम व अटी तयार करण्यात येतील व २५ तारखेला भाडेतत्वावर देण्याचा जाहीर लिलाव काढण्यात येईल. दोन्ही कारखाने सुरू झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात रक्कम बँकेत येईल व बँकेची पत सुधारेल , असेही चेअरमन बिराजदार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस बँकेचे व्हाईस चेअरमन कैलास शिंदे, संचालक बापुराव पाटील, सतीश दंडनाईक, सुनिल चव्हाण, संजय देशमुख, विलास बारकुल, घोणसे पाटील आदी उपस्थित होते. 

 
Top