उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

तुळजापुरातील मंकावती तीर्थकुंड बनावट कागदपत्रे तयार करुन बळकावल्याप्रकरणात पोलिसांनी देवानंद रोचकरी यांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे तुळजापुरात खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद पोलिसांनी मुंबईत मंत्रालय परिसरात ही कारवाई केली.

आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानंतर रोचकरी तसेच त्यांचा बंधू बाळासाहेब रोचकरीसह इतर आरोपींवर फसवणकुचा गुन्हा तुळजापूर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यानंतर रोचकरी बंधू पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर पोलिसांनी खबर्‍यांमार्फत माहिती मिळवित बुधवारी (दि. 18) मंत्रालय परिसरातून देवानंद रोचकरींना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

दरम्यान, मंकावती तीर्थकुंड हे तुळजाभवानी मंदीर परिसरातील प्राचीन कुंड आहे. या कुंडात पूर्वी भाविक स्नानासाठी जात असत. काही वर्षांपूर्वी वारसाहक्‍काने या कुंडाची मालकी आपल्याकडे असल्याचे सांगत रोचकरी यांनी ते बळकावले होते. ऐतिहासिक तसेच मंदिराचा भाग असलेले ठिकाणी खासगी कसे काय होऊ शकते, अशी विचारणा करीत अनेकांनी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्याकडे दाद मागितली होती. अखेर या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर बनावट कागदपत्रांआधारे ते बळकावल्याचे निष्पन्न झाल्याने रोचकरी बंधूंवर गुन्हा दाखल झाला आहे. ऐतिहासिक ठिकाण बळकावण्याच्या या रॅकेटमध्ये महसूलसह भूमीअभिलेख तसेच इतरही संबंधित शासकीय कार्यालयातील कोणाकोणाचा सहभाग आहे, हे आता पोलिस चौकशीत समोर येणास मदत होणार आहे.

 
Top