उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून युवक त्यांचे संघटन बांधण्याचे काम सुरू आहे. या युवकांमध्ये १९९७ नंतर जन्मलेल्या म्हणजेच १८ ते २५ या वयोगटातील युवकांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे युवकांचे संघटन करताना युवा नेता नको तर युवकांचा नेता असला पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दि.२१ ऑगस्ट रोजी युवा मोर्चाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा मोर्चा प्रसंगी युवकांना संबोधित करताना केले.

येथील यश लॉन्स येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, 

प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर, युवा वाँरीयर्सचे प्रदेश संयोजक अनुप मोरे, मराठवाडा संयोजक प्रेरणाताई  होनराव, जिल्हा प्रभारी अरुण पाठक, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, अजित पिंगळे, नितीन भोसले, इंद्रजित देवकते, राहुल काकडे, पुजा देडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, भाजपच्या फादर बॉडीचा एक गट तयार करण्यात येऊन त्यांच्या माध्यमातून युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांना योग्य दिशेने व झपाट्याने कार्य करण्यास गती मिळेल. तसेच युवा संघटनेत अनेक पदे देण्यात येतात मात्र पद महत्त्वाचे नसून ती जबाबदारी निभावणे महत्त्वाचे आहे या पदाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी युवा युवतींचा आवाज होण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कारण राज्यात खूप विदारक स्थिती असून जनतेला सरकार ऐवजी युवा वर्गाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. राज्य सरकार राज्यातील युवा युवती व जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहत नसल्याने मुळे या जनतेला या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगून ते म्हणाले की, जनता आपल्याकडे आस लावून बसलेली असून त्यांना मदत करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी हिरारीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. भाजपामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळते मात्र त्याच्यामध्ये ती धमक असली पाहिजे. विशेष म्हणजे आजपर्यंत आंदोलने केली असली तरी यापुढच्या काळात अनेक आंदोलने करावी लागणार असून त्यासाठी आक्रमक युवा आपल्याला घडवावे लागणार आहेत. बिगर राजकीय (नॉन पोलिटिकल) युवा वर्गाला जोडून घेणे आवश्यक असून यामध्ये खेळ, साहित्य, उद्योग व कला यासह विविध क्षेत्रातील युवकांचा समावेश करून मजबूत संघटन केले तरच युवावर्गाला जोडण्याची संकल्पना यशस्वी होऊ शकेल असेही त्यांनी सांगितले. 

 

 
Top